फोटोग्राफर बांधवांनी जपली सामाजिक बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

अपघाती निधन झालेले अर्जुन चाळक यांच्या कुटुंबियांना गेवराई तालुक्यातील फोटोग्राफर बांधवाकडून 70 हजारांची आर्थिक मदत

गेवराई (बीड): तालुक्यातील मादळमोही येथील फोटोग्राफर अर्जुन चाळक यांचे अपघातात निधन झाले आहे. चाळक यांची हलाखीची परिस्थिती असल्याने तालुक्यातील फोटोग्राफर्सकडून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे.

गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथील टोलनाक्याजवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली असता अर्जुन शहादेव चाळक (वय 45) वर्ष रा. मादळमोही यांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. 09) रोजी सायंकाळी आठ वाजता घडला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून फोटोग्राफीच्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केलेले अर्जुन चाळक यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या अचानक आपल्यातून जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

अर्जुन चाळक आपल्यातून निघून गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरू शकणार नाही. परंतु, आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबीयांना आधार देऊन आपण अर्जुन चाळक यांना श्रद्धांजली अर्पण करू शकतो, अशी भावना सर्व व्यापारी, मित्र, आप्तेष्ट आणि फोटोग्राफीच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या हितचिंतकांना व्हाट्सअप पोस्टद्वारे करून देत आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले.  याव्दारे चाळक कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यास सर्वजण सरसावले व सत्तर हजार तीनशे रुपये मदत जमा झाली. ही आर्थिक मदत मादळमोही येथील त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. आर्थिक मदत देत फोटोग्राफर बांधवांनी समाजाप्रती असलेली आपुलकी जपली आहे. तालुक्यातील व तालुक्याबाहेरील सर्व फोटोग्राफर यावेळी उपस्थित होते.

Web Title: Photographers donated 70 Thousand to Accidental family