लातुरातील वराहांचा महिनाभरात बंदोबस्त

विकास गाढवे 
रविवार, 8 जुलै 2018

जनावरांची गोरक्षणात रवानगी
शहरातील विविध रस्त्यावर ठाण मांडूण बसलेल्या मोकाट जनावरांना रोखण्यासाठी महापालिकेने उपाय शोधला असून या जनावरांची गोरक्षणात रवानगी करण्यात येणार आहे. याबाबत गोरक्षणासोबत चर्चा सुरू असल्याचे श्री. दिवेगावकर यांनी सांगितले. गोरक्षणमध्ये दाखल जनावरांचा शोध घेऊन पशुपालक ते परत घेऊन जातील, अशी आशा आहे. दरम्यान मोकाट कुत्र्यांच्या संख्येला रोखण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी कोणी पुढे येत नसून निविदांनाही प्रतिसाद मिळत नाही. पुणे व अन्य ठिकाणी यासाठी कार्यरत संस्थांशी चर्चा करण्यात येत असून लवकरच त्यावरही ठोस निर्णय होईल, असे श्री. दिवेगावकर यांनी सांगितले. 

लातूर : मोकाट वराहांमुळे त्रस्त असलेल्या शहरातील नागरिकांना महिनाभरात दिलासा मिळणार आहे. महानगरपालिकेने हा विषय चांगलाच ऐरणीवर घेतला असून आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी शनिवारी (ता. सात) वराहमालकांची बैठक घेतली. या सर्वांना एका महिन्यात वराहांचा बंदोबस्त करण्याबाबत मुदत दिली असून त्यानंतर महापालिकेकडून बंदोबस्त करण्याचा इशारा त्यांनी दिला. वराहांची संख्या तातडीने 75 टक्के कमी करण्यावरही बैठकीत चर्चा झाली.

शहरात दोन हजारहून अधिक वराहांची संख्या आहे. गाव भागासह आडत बाजारपेठेत या वराहांची संख्या मोठी आहे. वराहांचा सर्वाधिक त्रास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला होत आहे. महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने वराहांचा वावर असून त्यांच्याकडून अस्वच्छता निर्माण होत आहे. मध्यंत्तरी काही वराहांचा महाविद्यालयातील वीज उपकेंद्रात वीजेचा धक्का लागून मृत्यूही झाला होता.

महाविद्यालय प्रशासनाने अनेकदा या वराहांचा बंदोबस्त करण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. महापालिका आयुक्त दिवेगावकर यांनी हा विषय ऐरणीवर घेतला असून त्यांनी वराहांची संख्या तातडीने कमी करण्याचा उपाय शोधला आहे. यातूनच त्यांनी शनिवारी या वराहपालकांची बैठक घेतली. तब्बल पन्नासहून अधिक वराहपालक बैठकीला उपस्थित होते. सर्वांनी आमचा पारंपारिक व्यवसाय असून तो बंद पडल्यानंतर आम्ही करायचे काय? असा प्रश्न उपस्थित केला. आम्हाला नोकरी द्या किंवा व्यवसायासाठी साह्य करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. त्यावर श्री. दिवेगावकर यांनी सर्वांना फेरीवाला धोरणांतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्याला वराहपालक तयार झाले नाहीत. त्यावर दिवेगावकर यांनी सर्वांना महिन्याच्या आत वराहांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. महिन्यात बंदोबस्त न केल्यास वराहांचा बंदोबस्त महापालिकेकडून करण्यात येणार असून त्यासाठी निविदाही काढल्याची जाणीव त्यांनी वराहपालकांना करून दिली. तातडीने वराहांची संख्या नियंत्रित करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. दोन हजार वराहांची संख्या किमान पाचशेवर आणण्याबाबत आयुक्तांनी सर्वांना सुचना दिल्या.  

जनावरांची गोरक्षणात रवानगी
शहरातील विविध रस्त्यावर ठाण मांडूण बसलेल्या मोकाट जनावरांना रोखण्यासाठी महापालिकेने उपाय शोधला असून या जनावरांची गोरक्षणात रवानगी करण्यात येणार आहे. याबाबत गोरक्षणासोबत चर्चा सुरू असल्याचे श्री. दिवेगावकर यांनी सांगितले. गोरक्षणमध्ये दाखल जनावरांचा शोध घेऊन पशुपालक ते परत घेऊन जातील, अशी आशा आहे. दरम्यान मोकाट कुत्र्यांच्या संख्येला रोखण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी कोणी पुढे येत नसून निविदांनाही प्रतिसाद मिळत नाही. पुणे व अन्य ठिकाणी यासाठी कार्यरत संस्थांशी चर्चा करण्यात येत असून लवकरच त्यावरही ठोस निर्णय होईल, असे श्री. दिवेगावकर यांनी सांगितले. 

Web Title: pigs in Latur