पीककर्ज वाटपाचा नांदेडमध्ये बोजवारा

PHOTO
PHOTO

नांदेड : खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (ता. १५) नोव्हेंबरपर्यंत एक लाख १७ हजार सभासदांना ५२२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. कर्जवाटपाचे प्रमाण हे केवळ २६.५३ टक्के असल्याने यातून राष्ट्रीयीकृत बॅंकांची उदासीनता लक्षात येते. असे असताना जिल्हा मध्यवर्ती बॅंकने मात्र उद्दिष्टाच्या दीडपट पीककर्ज वाटप केले आहे.

खरीप हंगाम २०१९-२० साठी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप वेळेवर व्हावे याकरिता प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न केले जातात. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्हा अग्रणी बॅंकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ३० बॅंकांच्या शाखांना खरीप व रब्बी हंगाम २०१९-२० साठी दोन हजार ४५९ कोटी ३८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. यात खरीप हंगामासाठी एक हजार ९६७ कोटी ५१ लाख; तर रब्बी हंगामात ४९१ कोटी ८८ लाख रुपयांचा समावेश होता. शेतकऱ्यांना पीककर्ज तत्काळ वाटप करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. यासाठी मंडळ स्तरावर मेळावे घेऊन शेतकऱ्यांसाठी कर्ज मेळावे घेण्यात आले होते.

कर्जवाटपात मात्र बॅंकांनी हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. (ता. १५) नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील एक लाख १७ हजार ३७२ शेतकऱ्यांना (२६ टक्के) ५२२ कोटी पीककर्ज वाटप करण्यात आले. यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने १३६ टक्क्यांनुसार ५९ हजार शेतकऱ्यांना २४४ कोटींचे कर्जवाटप केले आहे. तर बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेने पाच टक्क्यांनुसार केवळ ५९७ शेतकऱ्यांना पाच कोटी नऊ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. तर जिल्ह्यात सर्वाधिक जाळे असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ३५ हजार ७३५ शेतकऱ्यांना दहा टक्क्यांनुसार ८६ कोटी ६९ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत तसेच व्यापारी बॅंकांचे प्रमाण खूपच कमी आहे.

रब्बीसाठी ४९२ कोटींचे उद्दिष्ट
रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात ४९१ कोटी ८८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सध्या रब्बीसाठी पीककर्ज वाटपाचा काळ असल्यामुळे ता.१५ नोव्हेंबरपर्यंत एक टक्का पीककर्ज वाटप केले आहे. यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया व अॅक्सिस बॅंकेने केलेले कर्ज वाटप वगळता इतर बॅंकांनी अद्याप कर्जवाटपाचे काम सुरू केले नाही.

पीककर्ज वाटप केलेल्या बॅंकांचे प्रमाण
(प्रमाण टक्क्यांत)
स्टेट बॅंक ऑफ इंडिया- १०.७४, बॅंक अाॅफ महाराष्ट्र- पाच, बॅंक अाॅफ इंडिया- ४.२३, सेंट्रल बॅंक अाॅफ इंडिया- २१.७५, बॅंक अाॅफ बडोदा- आठ, आलाहाबाद बॅंक- १४.५७, आंध्रा बॅंक १.४०, कॉर्पाेरेशन बॅंक व आयडीबीअाय बॅंक प्रत्येकी- दोन, पंजाब नॅशनल बॅंक- सहा, इंडियन ओव्हरसिज बॅंक- ५.२९, सिंडिकेंट बॅंक- १९, युको बॅंक- २२, कॅनरा बॅंक- २३, ओरियंटल बॅंक ऑफ कॉमर्स- ७.१४, पंजाब अॅण्ड सिंध बॅंक- २.८८, आयसीआयसी बॅंक - ११०, एचडीएफसी बॅंक - ९९, कर्नाटका बॅंक - ४०, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक- ३५, जिल्हा मध्यवती सहकारी बॅंक - १३७.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com