औरंगाबादमध्ये पाऊस नसतानाही पूर; घरे-दुकानांत पाणी, नागरिक बेहाल

माधव इतबारे
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

लाखो लिटर वाहत असल्यामुळे रस्त्यावर पुराची स्थिती होती. अचानक पाणी पाहून अनेकांची धांदल उडाली. आजूबाजूच्या सुमारे 35 ते 40 घरे, रुग्णालय, दुकानात पाणी शिरले. काही अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले होते.

औरंगाबाद -  कोकणवाडी चौकात गुरुवारी (ता. 22) मध्यरात्री 1,400 मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन फुटल्याने निम्म्या शहरात आज (ता. 23) ठणठणाट होता. पाइपलाइन फुटल्यानंतर तब्बल दीड तासाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला जाग आली. दरम्यान, लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहिले. शहरात पाऊस नसताना पूर आल्याची स्थिती रेल्वेस्टेशन रस्त्यावर होती.

हे पाणी अनेक हॉटेल्स, अंडरग्राऊंडमध्ये असलेल्या दुकानांमध्ये शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. महापालिकेने सकाळी पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले; मात्र 12 तासानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरवासीयांना दुष्काळामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले. दरम्यान, पावसाळा सुरू झाला, नाशिक परिसरात झालेल्या पावसामुळे नाथसागरही काठोकाठ भरला; मात्र शहरातील पाणी टंचाई दूर झालेली नाही. कधी पाइपलाइन फुटल्याने तर कधी तांत्रिक बिघाडामुळे शहरात आजही चार-पाच दिवसांआड पाणी मिळत आहे.

दोन आठवड्यापूर्वी रोहित्र जळाल्याने तब्बल आठ दिवस पाणीपुरवठा विस्कळित झाला. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे वाटत असतानाच गुरुवारी रात्री एकच्या सुमारास अग्निशमन विभागाच्या कार्यालयाशेजारी बन्सीलालनगर येथे 1,400 मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन फुटली. नक्षत्रवाडी येथील एमबीआरपासून शहराला पाणीपुरवठा ही मुख्य पाइपलाइन आहे. पाइपलाइन फुटताच क्षणात रस्त्यावर पाणीच पाणी झाले. 
 
नागरिक झाले बेहाल
लाखो लिटर वाहत असल्यामुळे रस्त्यावर पुराची स्थिती होती. अचानक पाणी पाहून अनेकांची धांदल उडाली. आजूबाजूच्या सुमारे 35 ते 40 घरे, रुग्णालय, दुकानात पाणी शिरले. काही अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले होते. बन्सीलालनगरातील शुभम जैस्वाल यांनी अग्निशमन विभागाला पाइपलाइन फुटल्याची माहिती दिली. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाला कळविण्यात आले; मात्र तोपर्यंत दीड तास रस्त्यावर पाणी वाहत होते. पाणीपुरवठा बंद केल्यानंतर अग्निशमन विभागाने मदतकार्य सुरू केले. अपार्टमेंटच्या पार्किंगमधील पाण्याचा उपसा सुरू केला. सकाळी पाच ते साडेपाच हे काम सुरू होते. पटवर्धन हॉस्पिटल, मोक्ष हॉटेल, सपना सुपर मार्केट, टाकसाळी मंगल कार्यालय, आयुर्वेदिक आरोग्य केंद्र येथेही खालच्या मजल्यात पाणी शिरले होते. दरम्यान, सकाळी पाणीपुरवठा विभागाने खोदकाम करीत दुरुस्तीचे काम हाती घेतले. दिवसभर वाहिनीची दुरुस्ती सुरू होती. 12 कामगार काम करीत होते; मात्र पाइपलाइनला मोठी गळती असल्याने दुरुस्तीकरिता तब्बल बारा तास लागले. दरम्यान शुक्रवारी निम्म्या शहरात निर्जळी होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pipeline broken at Aurangabad