मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याची झाली चाळणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

न्यायालयाच्या आदेशाने जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी शेकडो मालमत्ता भुईसपाट करून रुंदीकरण करण्यात आले; मात्र या रस्त्याची दैना अद्याप संपलेली नाही. हजारो प्रवाशांना रोज खड्डे, चिखलातून वाट काढून रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे. 

औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशाने जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी शेकडो मालमत्ता भुईसपाट करून रुंदीकरण करण्यात आले; मात्र या रस्त्याची दैना अद्याप संपलेली नाही. हजारो प्रवाशांना रोज खड्डे, चिखलातून वाट काढून रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे. 

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर पॅसेंजरसह हायकोर्ट एक्‍स्प्रेसचा थांबा आहे. त्यामुळे दिवसभरात हजारो प्रवाशांची याठिकाणी वर्दळ असते. सकाळ-सायंकाळ रेल्वेस्टेशन गजबजलेले असते; मात्र रेल्वेस्टेशनपर्यंत वाट काढताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने या रस्त्याचे रुंदीकरण केले होते. त्यासाठी शेकडो मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. रस्ता रुंदीकरणासाठी अनेक मालमत्ताधारकांनी सहकार्यदेखील केले; मात्र अद्याप रस्त्याची दैना संपलेली नाही. जयभवानीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून खड्ड्यांचा सिलसिला सुरू होतो तो मुकुंदवाडी स्टेशनपर्यंत कायम आहे. जरासा पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणीच पाणी होते. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून, पावसाचे
पाणी साचल्यामुळे रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांना दिसत नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांना या खड्ड्यातून मार्ग काढताना नाकीनऊ येत आहे. त्यात स्टेशनवर उतरल्यानंतर समोरच चिखलामुळे दलदलीसारखी अवस्था झाली आहे. 
  
कामाच्या नुसत्याच घोषणा 
या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत काम केले जाणार असल्याचे महापालिका पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे महापालिकेने देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष केले. रस्ता रुंद असला तरी अर्ध्या रस्त्यावरच डांबर असून, त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. 
 

सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे महापालिकेमार्फत मुरूम टाकून घेतला होता. 125 कोटींच्या प्रस्तावात हा रस्ता असून, शासन
निधीतून या रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न आहे. 
प्रमोद राठोड,  भाजप गटनेते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits on Mukundwadi road at Aurangabad