ओसाड टेकड्यावरही फुलणार वनराई

plantation on hills
plantation on hills

लातूर : अनेक वर्षापासून ओसाड पडलेल्या टेकड्यावर आता वनराई फुलणार आहे. वन विभागाने यंदा पहिल्यांदाच वृक्ष लागवडीसाठी या टेकड्यांची निवड केली असून त्यासाठी जिल्ह्यातील बारा टेकड्यांची निवड केली आहे. सरकारने हाती घेतलेल्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेत टेकड्यांवरील 129 हेक्टवर विविध प्रकारच्या सुमारे एक लाख 69 हजार आठशे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यातूनच मोहिमेत जिल्ह्याला दिलेले 33 लाखाचे उद्दिष्ट ओलांडून 44 लाख साठ हजार वृक्ष लागवडीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते रविवारी (ता. 1) सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात या वनमहोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. राज्यातील वनक्षेत्राचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकारने 2017 ते 2019 या तीन वर्षात राज्यात पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमात यंदा राज्याभरात तेरा कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यात जिल्ह्याला 33 लाख सहा हजार 198 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असले तरी जिल्हा प्रशासनाने त्याहून अधिक म्हणजे 43 लाख साठ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. 

यात वनविभागाकडून नऊ लाख 90 हजार, सामाजिक वनीकरणाकडून तीन लाख 32 हजार, ग्रामपंचायतीकडून आठ लाख 61 हजार तर अन्य सरकारी यंत्रणांकडून 21 लाख 84 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीसाठी खोदलेल्या खड्ड्यांची माहिती वन विभागाच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. 

वनविभागाने यंदा वृक्ष लागवडीसाठी वनक्षेत्रातील टेकड्यांची निवड केली असून आजपर्यंत टेकड्यांवर (डोंगर) कधीच वृक्ष लागवड करण्यात आली नव्हती. यामुळे तब्बल 129 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्यासाठी कासार बालकुंदा, हांबीरबाबा टेकडी, शिराढोण (ता. निलंगा), नागराळ (ता. देवणी), करजगाव (ता. औसा), हत्तीबेट, तोंडार (ता. उदगीर), डोंगरज, हणमंत जवळगा, वडवळ नागनाथ, नायगाव व हिंप्पळनेर (ता. चाकूर) येथील टेकड्यांची निवड करण्यात आल्याचे सहायक वनरसंरक्षक आर. जी. मुदमवार यांनी दिली.

प्रत्येक ग्रामपंचायतीला 1091 रोपे
वनमहोत्सवासाठी जिल्ह्यातील 788 ग्रामपंचायतीला प्रत्येकी एक हजार 91 रोपे लागवडीसाठी देण्यात येणार आहे. वन विभागाकडून ही रोपे गावात पोहच करण्यात येणार असून अन्य सरकारी यंत्रणांनी मात्र, जवळच्या रोपवाटिकेतून रोपे घेऊन जायची आहेत. वन विभागाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट तडीस नेण्यासाठी रोपांची मुबलक उपलब्ध केल्याचे श्री. मुदमवार यांनी सांगितले. वन महोत्सवात नऊ महिन्यांचे रोप आठ रूपये तर 18 महिन्यांचे रोप चाळीस रूपयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था व गरजूंनाही सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्वांनी पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले आहे.    
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com