नाटकाने मला जिवंत ठेवले - जयंत सावरकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

उस्मानाबाद - 'आतापर्यंत 110 नाटकांमध्ये कामे केली, काही नाटकांचे अनेक प्रयोग केले. वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेवर मनापासून प्रेम केले. प्रत्येक भूमिकेने मला काही ना काही तरी दिले, नाटकापासून मिळालेल्या सुखाचा आनंद मोजता येत नाही. नाटकाने मला जिवंत ठेवले आहे,'' असे मत 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सावरकर यांची अमित भंडारी यांनी प्रकट मुलाखत घेतली. या वेळी त्यांनी बॅकस्टेजपासून ते नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासातील अनेक अनुभव सांगितले. सावरकर म्हणाले की, नाटकामध्ये येण्याला नातेवाइकांचा विरोध होता. मध्यमवर्गीयांचे जीवन जगणारे आमचे कुटुंब होते. 1955 मध्ये नाटकांशी संबंध आला. नाट्यक्षेत्रात आल्यानंतर कमी शिक्षणाची लाज वाटावी, अशी परिस्थिती होती. कारण या क्षेत्राशी संबंधित असलेली माणसे उच्च विद्याविभूषित अशीच होती. त्यांच्यापर्यंत कसे पोचता येईल, असा प्रयत्न केला.

एका कीर्तनकारांकडून व्याकरण शिकता आले. त्यांचे अनुकरण हे अभिनयाच्या यशाची पायरी ठरली. तो पुढे एक कर्तृत्वाचा महत्त्वाचा दुवा ठरला. प्रारंभी एका नाटकात अपयश आले; परंतु कधीच पिचून गेलो नाही. यश मिळण्यासाठी काम करावे लागते, याची किंमत मला त्या वेळी कळाली. नकारात्मक विचार कधीच केला नाही. त्यामुळे पुढील आयुष्य सुकर गेले, असेही सावरकर यांनी सांगितले.

बॅकस्टेजचा उपयोग नट होण्यासाठी
नाटकाची आवड असल्यामुळे टेपरेकॉर्डर, पार्श्वसंगीत, हिशोब लिहिणे, प्रॉम्पटिंग करणे आदी कामे मिळावी म्हणून आपण प्रयत्न केला असल्याचे सावरकर यांनी सांगितले. बॅकस्टेजचा उपयोग नट होण्यासाठी झाला. आतापर्यंत 110 नाटकांमध्ये काम केले; परंतु शारदा नाटकातील श्रीमंताचं आणि कडाष्टक नाटकातील कर्करावांचं काम करावे, अशी मनापासून इच्छा होती. हे काम मला अजूनपर्यंत मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे मिळाल्यानंतर कालचा (शुक्रवार) दिवस कसा होता, या प्रश्नाला उत्तर देताना सावरकर म्हणाले की, माझी निवड बिनविरोध झाली. काल सूत्रे स्वीकारल्यानंतर उस्मानाबादकरांनी मला नवसंजीवनी दिली.

Web Title: The play keeps me alive