प्रशिक्षण केंद्र बंद असल्याने खेळाडूंच्या कारकिर्दीवर टांगती तलवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

विविध खेळांचे प्रशिक्षण 
सध्या भारतीय खेळ प्राधिकरणाच्या निवासी प्रशिक्षणात १५३ खेळाडू खेळ शिकतात. यात प्रामुख्याने तिरंदाजी, ॲथलेटिक्‍स, हॅंडबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी, तायक्वांदो आदी खेळांचे प्रशिक्षण हे खेळाडू घेतात. दरवर्षी खेळाडू निवडण्यासाठी होणारी निवड चाचणी यंदा झालीच नाही.

औरंगाबाद - गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भारतीय खेळ प्राधिकरण (साई) मधील प्रशिक्षण केंद्र यंदा सुरूच झाले नसल्याने तब्बल १५३ खेळाडूंच्या कारकिर्दीवर टांगती तलवार आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्यानंतर घरी परतलेले खेळाडू यंदा हे प्रशिक्षण सुरू न झाल्याने औरंगाबादेत आले नाहीत. त्यामुळे त्यांची शैक्षणिक कारकीर्दसुद्धा धोक्‍यात आली आहे. 

‘साई’मधील विद्यार्थ्यांच्या निवासी प्रशिक्षणासाठी मिळणारे दोन कोटी रुपयेसुद्धा न आल्याने देयकांचा डोंगर प्राधिकारणासमोर उभा राहिला आहे. विविध चाचणीच्या माध्यमातून निवड झालेल्या खेळाडूंच्या शिक्षणाची व्यवस्था भारतीय खेळ प्राधिकरणातर्फे करण्यात आली आहे. औरंगाबादेत प्रवेश घेऊन शिक्षण घेणारे हे शेकडो खेळाडू पेचात सापडले आहेत. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात सराव करणाऱ्या या खेळाडूंच्या प्रशिक्षकांचे पगार मात्र सुरू आहेत. अनुदान न मिळाल्याने वसतिगृहाची डागडुजीची व्यवस्था झाली नाही.

यामुळे मुलांना परत बोलावण्यातच आले नसल्याचे पत्रकारांशी बोलताना उपसंचालक व्ही. के. शर्मा म्हणाले. गत दोन महिन्यांत दोन वर्षांची कामे साईमध्ये झाली असल्याचा दावा करीत त्यांनी हा प्रश्न लवकर सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली.

आता फक्त नॅशनल कॅंप? 
भारतीय खेळ प्राधिकरणाच्या माध्यमातून खेळाडू घडवण्याची चळवळ मराठवाड्यात वेग घेत असताना हे प्रशिक्षण बंद पडणे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया क्रीडा जगतात उमटली. निधी मिळत नसल्याने मराठवाड्यातील खेळाडूंची कुचंबणा होत आहे. यापुढे इथे निवासी प्रशिक्षण न देता केवळ राष्ट्रीय संघांची प्रशिक्षण शिबिरे घेण्याची मानसिकता येथील कारभाऱ्यांची आहे. त्यामुळे मराठवाड्यातील खेळाडूंना याचा लाभ होणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

फोन केल्यावर या
गेल्यावर्षी १५ जूनला सत्र सुरू झाले होते. दरवर्षी पत्र विद्यार्थ्यांना पाठवून बोलावल्या जाते. यंदा अद्याप पत्र पाठवण्यात आले नाही. खेळाडूंनी प्रशिक्षकांना विचारणा केल्यावर निश्‍चित काहीच नाही. फोन करून बोलवल्यावर येण्याचे खेळाडूंना सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Player Career Training Center Close