पोखर्णीची दुष्काळानं ‘पोखरण’

Drought
Drought

‘डोंगरदऱ्यात वसलेली जिंतूर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरची दोन गावं, पोखर्णी व पोखर्णी तांडा. लोकसंख्या दोन हजार. त्यातही साठ टक्के मजूर, उर्वरित अल्पभूधारक. गावात यंदाही दुष्काळाचंच ठाण. पावसाअभावी खरीप तर मातीत गेलाच; पण रब्बीचेही भविष्य धोक्‍यात आले. रानात चारा आणि पाणी नाही. अशा स्थितीत गुरं-ढोरं कशी जगवावी हा डोंगराएवढा प्रश्‍न ग्रामस्थांपुढे आहे’. पोलिस पाटील पंडित काचगुंडे, सरपंच कविता राठोड व शेतकरी गणेश राठोड दुष्काळानं होरपळलेल्या गावाचं एक एक पान उघडत होते. 

गेल्या चार वर्षांपासून असलेल्या अपुऱ्या पावसामुळे जिंतूर तालुका दुष्काळाशी दोन हात करीत आहे. त्यात यंदाही अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारली. तालुक्‍यात सुमारे ८५ टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खरिपातील अल्पजीवी पिके करपून गेली. अपवाद वगळता सोयाबीनमध्येही पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट आली. कापूसही विविध रोगांच्या कचाट्यात सापडल्याने डोंगरभागात कापसाची दुसरी वेचणी होईल की नाही? अशी चिंता शेतकरी व्यक्त करतात. जिंतूर तालुक्‍यात साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जमीन कोरडवाहू, हलकी व मुरमाड आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहत नाही. परिणामी यंदा रब्बी हंगामाकडूनही शेतकऱ्यांना फार आशा राहिल्या नाहीत. दुसरीकडे गेल्या महिन्यापासून उन्हाचा पारा ३६ अंशांपर्यंत पोचत असल्याने तालुक्‍यातील ओढे, नाले, कोरडे पडले. विहिरी खोल गेल्या. जेमतेम महिनाभर पुरेल एवढेच पाणी गावात शिल्लक आहे. यात जनावरांचे हाल अत्यंत बिकट आहेत. पोखर्णी व तांडा या भागात यंदा सोयाबीन, कापूस, तूर, हळद या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे; पण शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने दडी मारली. त्यामुळे उत्पादन अर्धे घटत आहे. कापसाची वाढ खुंटल्याने दुसरी वेचणी होण्याची आशा धूसर आहे. तुरीचे पीक उन्हाच्या तीव्रतेने सुकत आहे. हळदीची स्थितीही वेगळी नाही. दहा वर्षांपासून होऊ घातलेली येथील योजना अद्यापही अपूर्णच असल्याने गावात पाण्याची समस्या आहे. बहुतेक कूपनलिका आटल्या. पाच हातपंपांना महिनाभर पुरेल एवढेच पाणी आहे. 

मजूर स्थलांतराच्या तयारीत  
खरीप हंगाम संपताच पोखर्णी व तांड्यातील पाचशेपेक्षा जास्त मजूर कामाच्या शोधात जिल्ह्याबाहेर स्थलांतर करतात. यंदाही दुष्काळी परिस्थितीमुळे मजूर स्थलांतराच्या तयारीत आहेत, असे ऊसतोड मजूर बबन प्रल्हाद राठोड यांनी सांगितले. बबन व त्यांचे दोन भाऊ कुटुंबासह दरवर्षी दिवाळीनंतर मजुरीसाठी स्थलांतर करतात.

येथील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन परिसरात मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे. पाणी समस्येचा विचार करून गाव व तांड्यासाठी दोन विहिरी अधिग्रहित कराव्यात.
- कविता जाधव, सरपंच, पोखर्णी तांडा (ता. जिंतूर) 

हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही. मग इथे राहायचे कशाला? रोजगाराच्या शोधात परजिल्ह्यांत जावे लागत आहे. सणाच्या दिवसांत स्थलांतर करावे लागत आहे.
- बबन राठोड, कामगार, पोखर्णी तांडा

उंडरगाव टंचाईच्या कवेत
लोहारा तालुक्‍यातील उंडरगाव. आजूबाजूला तीन तालुक्‍यांच्या सीमा. लोकवस्ती तीन हजार; पण घराघरांत उदरनिर्वाह, रोजगार आणि कर्जाचीच विवंचना. त्यामुळे यंदाही गावातील कैक घरांच्या उंबऱ्यांना दुष्काळ शिवला अन्‌ पदरी पडली ती घोर निराशा.

पावसाने दगा दिल्याने उंडरगाव परिसराला दुष्काळाने कवेत घेतले. पाणीटंचाई, चाराटंचाई गंभीर होत आहे. पंधरा दिवस पुरेल इतकाच जलसाठा गावात असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. येथील शेती पावसाच्या पाण्यावर विसंबून असल्याने गाव सतत दुष्काळाच्या झळा सोसत आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळी फटक्‍यामुळे यंदा मोठी अपेक्षा होती; पण हात धुऊन मागे लागलेला दुष्काळ पिच्छा सोडायला तयार नाही. शेतीसाठी मुबलक खर्च केला; पण डोळ्यांदेखत पिकं मातीत गेल्याने गाव संकटात सापडलं. 

आता शेतात कामच उरले नसल्याने हाताला काम नाही. त्यामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत ‘शेतीसाठी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे अन्‌ घरप्रपंच चालवायचा कसा. हिरवे स्वप्नच भंगल्यामुळे वेदना होत आहेत’, असे शेतकरी महादेव रवळे हे सांगत होते. ‘दुष्काळी स्थितीमुळे अर्थचक्र पार बिघडून गेले. शासनाने दुष्काळ जाहीर करून विनाविलंब मदतीचा हात देण्याची गरज’ विठ्ठल सूर्यंवशी यांनी व्यक्त केली. 

पंधरा दिवसच पुरेल पाणी 
हिप्परगा रवा शिवारात असलेल्या तलावातून उंडरगावाला पाणीपुरवठा केला जातो; परंतु तलाव कोरडा आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीत १५ दिवस पुरेल इतकेच पाणी आहे. शिवारातील विहिरी, कूपनलिकांतील पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली असून, टॅंकरचा आधार घ्यावा लागणार. 

पावसाअभावी शेती साथ देत नाही. दुष्काळ पाठ सोडायला तयार नाही. जनावरांच्या चाऱ्याची स्थिती बिकट असल्याने पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत १५ पशुपालकांनी पशुधन विकले आहे. 
- रमेश साखरे, शेतकरी

जनावरं जगविण्यासाठी आता आधार भुस्कटाचाच
यंदा लई अवघड झालंय बघा, पावसामुळं रब्बीची पेरणीच झाली नसल्यानं कडबा होणार नाही. चार हजार रुपये देऊन बळंच सोयाबीनचं चार बॅगचं भुस्कट घेतलंय. घरचे दोन बैल अन्‌ एका गायीला उन्हाळ्यात ह्याचाच आधार आहे, असे म्हणत भुस्कटाची बैलगाडी घेऊन जाणाऱ्या मनुरावाडीच्या अभिमान पवारांनी जनावरांच्या चारा प्रश्नाची दाहकता व्यक्त केली.

शहरापासून सात किलोमीटर अंतरावरील मनुरावाडी शिवारात शेतातील सोयाबीनच्या भुस्कटाचा ढीग झाडून बैलगाडीत भरताना विक्रम पवार बोलते झाले. यंदा पाऊसच नसल्याने खरिपाची पिके तर हातची गेलीच; परंतु रब्बीची पेरणीही झाली नाही. त्यामुळे जनावरांना खायला काय घालायचे ? हा मोठा प्रश्न पडला आहे. हेच दोन बॅगचं भुस्कट घरी नेऊन महिना, दोन महिने का होईना जितराबाच्या पोटाचा प्रश्न तरी मार्गी लागंल, असे म्हणत यंदा माणसापेक्षा जनावरांचा प्रश्न बिकट असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी कितीही नगदी पिकाकडे वळला असला तरी, घरची जनावरं जगविण्यासाठी कडब्याची गरज असल्याने रब्बीला ज्वारीची पेरणी करतोच. यावर्षी परतीच्या पावसानेही दगा दिल्याने रब्बीच्या पेरणीअभावी शिवारातील काळ्या रानात जनावरांच्या चाऱ्याचं भीषण संकट दिसत होतं. यामुळे सोयाबीनची खळे झाल्यानंतर भुस्कट घरी नेण्याची शेतकऱ्यांची लगबग दिसून येत होती. दरवर्षी शेजाऱ्याला फुकटात भुस्कट देणारे शेतकरी हजार रुपयाला बॅगप्रमाणे विकत आहेत. रब्बीची पेरणी न झाल्याने कडबा आणि पावसाअभावी हिरवा चारा नसल्याने शेतकऱ्यांना जनावरांसाठी सोयाबीनच्या भुस्कटचाच आधार घ्यावा लागत आहे.

हातातोंडाशी आलेलं खरीपही गेलं अन्‌ रब्बीचा तर प्रश्नच नाही. आता सरकारच शेतकऱ्यांचा वाली आहे. पुढचं वर्ष लई अवघड आहे; सरकारनं लवकर काहीतरी पदरात टाकावं.
- भगवान पवार, शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com