पोलिस शिकवणार ‘धडा’

latur
latur

लातूर : सावधान... विद्यार्थिनी असतानाही ज्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमध्ये महिला मदतनीस नाहीत, यासह सरकारने घालून दिलेले सुरक्षित वाहतूकीचे इतर नियम डावलणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी घेतला आहे. याशिवाय, सर्व शाळांनी शालेय परिवहन समिती स्थापन कराव्यात यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने संयुक्त मोहिम राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.

लातूरजवळील औसा तालूक्यात एका शालेय विद्यार्थिनीवर स्कूलबस चालकाने आणि मदतनीसाने अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या पीडित विद्यार्थिनीने स्वत:चे आयुष्य संपवले. या घटनेमुळे तमाम पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, ‘सकाळ’ने विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमधील मदतनीस आणि शहरातील, जिल्ह्यातील शाळांमधील शालेय परिवहन समितीचा आढावा घेतला. त्यावेळी शहरातील एकाही शाळेने परिवहन समिती स्थापन करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ऑनलाइन नोंदणी केली नसल्याचे आणि बहुतांश वाहनांमध्ये महिला मदतनीस नसल्याचे समोर आले. याची दखल घेऊन डॉ. माने यांनी कडक पावले उचलली आहेत.

डॉ. माने म्हणाले, ‘‘महिनाभरापूर्वी शहरातील शाळांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात सुरक्षित वाहतूकीसंदर्भात असलेले कायदे, नियम आम्ही शाळांना समजावून सांगितले होते. त्यानूसार शाळांनी परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक होते. याबरोबरच स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थिनी असतील तर महिला मदतनीस असणे हेही अनिवार्य आहे. पण या नियमांची पूर्तता न करणाऱ्या शाळा आणि वाहनांविरोधात आम्ही धडक कारवाई करणार आहोत. ही कारवाई सोमवारपासून (ता. ८) शहरात आणि जिल्ह्यात सुरू होईल. विद्यार्थी सुरक्षितता हा महत्वाचा विषय आह. याकडे शाळा आणि संबंधीत चालक-मालकांनी दुर्लक्ष करू नये.

सरकारच्या अध्यादेशात जे-जे नियम सांगितले आहेत, त्याची पूर्तता झाली पाहिजे. ती झाली नसेल तर कडक कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

हे आहेत महत्वाचे नियम
- स्कूल बस, व्हॅनला पिवळा रंग हवा; वाहन १५ वर्षांपेक्षा जास्त जुने नसावे
- चालकाकडे वाहन चालविण्याचा पाच वर्षांचा अनुभव आणि बिल्ला हवा
- विद्यार्थ्यांचे नाव, पत्ते, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट ही माहिती वाहनांमध्ये हवी
- वाहनात विद्यार्थिनी असतील तर मदतीसाठी महिला मदतनीस नेमणे अनिवार्य आहे
- वाहनांमध्ये प्रथमोपचार साहित्य, अग्निशमन यंत्रणा हवी. 
- वाहनांमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवू नयेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com