पोलिस-गणेश मंडळांत वाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - औरंगाबाद पश्‍चिम विभागातून औरंगपुऱ्याकडे सिटी चौकमार्गे विसर्जन मिरणवूक काढण्यात येते. मात्र, यंदा क्रांती चौक, पैठण गेटमार्गे विसर्जन मिरवणूक काढल्यामुळे पोलिस आणि गणेश मंडळांत रविवारी (ता. २३) वाद झाला. दरवर्षी आमच्यावर अन्याय होतो, आम्हाला सादरीकरण करण्यास संधी मिळत नाही. यामुळे या नव्या मार्गाने मिरवणूक काढल्याचे गणेश मंडळांतर्फे सांगण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर ही मिरवणूक क्रांती चौकमार्गे पुढे पाठविण्यात आली.

पश्‍चिम विभागातून पदमपुरा मित्र मंडळ, हरहर महादेव क्रीडा मंडळ, बाल गजानन गणेश मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या तिन्ही मंडळांची मिरवणूक विसर्जनासाठी सिटी चौकमार्गे गुलमंडी, औरंगपुरा ते जिल्हा परिषदेच्या मैदानापर्यंत जाते. या मार्गात आम्हाला सादरीकरणासाठी संधी मिळत नाही. आम्हाला स्वतंत्र मार्ग देण्याची मागणी मंडळांतर्फे करण्यात आली. मात्र, या नव्या मार्गाला जिल्हा गणेश महासंघाने नकार दिला होता. पोलिसांनीही क्रांती चौकमार्गे जाल तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. पोलिसांचा विरोध पाहता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला होता. मिरवणुकीच्या दिवशी गणेश मंडळांनी हा विरोध झुगारून क्रांती चौकमार्गे मिरवणूक काढली. क्रांती चौकात पोलिस आणि गणेश मंडळांत वाद झाला. त्यावेळी पोलिस उपायुक्‍त निकेश खाटमोटे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर गजानन बारवाल, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार संजय शिरसाट, भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी धाव घेत पोलिसांची समजूत काढली. त्यानंतर मिरवणूक पैठण गेटकडे नेण्यात आली.

गुन्हा दाखल नाही
मिरवणुकीचा मार्ग बदलल्यामुळे गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. याविषयी पोलिस निरीक्षक अनिल आडे यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी गुन्हे दाखल झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

पश्‍चिम विभागातील गणेश मंडळांना दरवर्षी गुलमंडीवर सादरीकरणासाठी संधी मिळत नाही. ही मंडळे पंधरा ते वीस दिवस सराव करतात. याविषयी जिल्हा गणेश मंडळानेही लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, त्यांनीही विरोध केल्याने वाद झाला.
- किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष, भाजप

Web Title: police and ganesh mandal dispute