नांदेडात खंडणीखोर पोलिसांच्या जाळ्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 7 एप्रिल 2019

नांदेड शहरातील व्यापाऱ्यांना धमकी दाखवून खंडणी मागणाऱ्या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. 

नांदेड : शहरातील व्यापाऱ्यांना धमकी दाखवून खंडणी मागणाऱ्या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. शहीदपूरा भागात रविवारी (ता. 7) पहाटेच्या सुमारास कारवाई केली.

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हरफुलचंद्र बद्रीप्रसाद यादव या व्यापाऱ्यास व त्याच्या परिवारास दुखापत करून ठार मारण्याची धमकी देऊन मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिली. यावेळी खंडणीखोरांनी त्या व्यापाऱ्यास दहा लाखाची खंडणी मागितली होती. याप्रकरणी विमानतळ ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांचया पथकांनी अटक केली होती. परंतु त्याचा साथिदार रविंद्रसिंघ उर्फ विक्की मेजरसिंग राय (वय 19) रा. शहीदपूरा, नांदेड हा फरार होता. त्याला रविवारी पहाटे शहिदपूरा भागातून अटक केली. पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे आणि पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांंच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान यांचा बंदोबस्त संपला की लगेच रात्री हे पथक गस्तीवर गेले. या दरम्यान त्यांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींविरूध्द खंडणीसह अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपीला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे टी. दिघोरे यांनी सांगितले.

Web Title: Police arrested the ransomers in Nanded Local crime branch action