मटक्‍याच्या नादात पोलिस बनला चोर!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - हाती पडलेला पगार मटक्‍यात घातला. सुरवातीला लक्ष्मीदर्शन झाले; पण नंतर मात्र मटक्‍यात सर्व पैसा घातला अन्‌ कर्जबाजारी झाला. चार लाखांचे कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्‍न पडल्यानंतर त्याने मंगळसूत्र चोरीचा मार्ग निवडला. शेवटी पैशांच्या हव्यासापोटी गुरफटला तो गुरफटलाच. हाती बेड्या पडताच रड-रड रडलाही.

पोलिसांनी सांगितले, की योगेश शिनगारे अकरा वर्षांपासून सातारा येथील राज्य राखीव पोलिस दलात रुजू आहे. वडील शिक्षक. लग्नानंतर दोन मुले झाली; पण मटक्‍याचे व्यसन जडले. त्याला वाटले अजून पैसा येईल. या हव्यासात त्याच्यावर चार लाखांचे कर्ज झाले. ते फेडायचे आणि हव्यासही पूर्ण करायचा. अशा पेचात असताना त्याला दुर्बुद्धी सुचली व मंगळसूत्र चोरीकडे तो वळला. सुरेखा ठाले (रा. रेणुकापुरम, सातारा परिसर) 24 ऑगस्टला परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात पायी जात होत्या. बीएसएनएल कार्यालयाजवळ हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने त्यांच्या पुढे येत निर्जनस्थळी त्यांचे मंगळसूत्र हिसकावले. चोरीसाठी त्याने विनाक्रमांकाच्या दुचाकीचा वापर केला होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून राज्य राखीव दलाचा पोलिस योगेश शिनगारे होता. याच पद्धतीने अन्य काही महिलांचेही दागिने चोरले असून हाती बेड्या पडल्यानंतर मात्र त्याला रडू आवरत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

घरात एक ग्रॅमही सोने नाही...
योगेशच्या घरात एक ग्रॅमही सोने नव्हते. मटक्‍याच्या नादापायी महिलांचे चोरलेले दागिने तो विकत गेला. जवाहरनगर येथील एका सराफा व्यापाऱ्याला मी दागिने विकले. मला तिकडे न्या, सराफा दुकान दाखवतो, असेही त्याने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: police becomes chain snatcher crime