पोलिसांचा पाठलाग, पोलिसाला पकडण्यासाठी !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

हिंगोली - सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत लाच प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या सहायक पोलिस निरीक्षकास (एपीआय) पकडण्याचा खेळ गुरुवारी दुपारी चांगलाच रंगला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाठलाग करीत धूम ठोकलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाला अटक केली.

हिंगोली - सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत लाच प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या सहायक पोलिस निरीक्षकास (एपीआय) पकडण्याचा खेळ गुरुवारी दुपारी चांगलाच रंगला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाठलाग करीत धूम ठोकलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाला अटक केली.

चोंडी (ता. सेनगाव) येथील वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या मेव्हण्याची दुचाकी सोडून देण्यासाठी गोरेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी जैताडे याने 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी संबंधित तक्रारदारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यावरून लाचलुचपतचे उपाधीक्षक रवींद्र थोरात, पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील, नितीन देशमुख यांच्या पथकाने गोरेगाव-हिंगोली मार्गावर 27 डिसेंबर 2018 ला सापळा रचला. या प्रकरणात चोंडी येथील पोलिस पाटील दीपक अंभोरे व खासगी व्यक्ती विलास प्रभाकर काळे याने मध्यस्थी केली. ही रक्कम स्वीकारताना विलास काळे यास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी जैताडे, पोलिस पाटील दीपक अंभोरे व विलास काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान, या प्रकरणात लाचलुचपतच्या पथकाने केलेल्या तपासामध्ये सहायक पोलिस निरीक्षक माधव कोरंटलू यांचा सहभाग असल्याचे आढले. त्यावरून आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माधव कोरंटलू यांना चौकशीसाठी बोलावले. चौकशीनंतर त्याचा या प्रकरणात असलेला सहभाग स्पष्ट करून अटक केली जाणार असल्याचे त्याला सांगण्यात आले. हे ऐकताच काही वेळातच माधव कोरंटलू याने कार्यालयातून धूम ठोकली. त्याला पकडण्यासाठी उपाधीक्षक रवींद्र थोरात, निरीक्षक जितेंद्र पाटील, नितीन देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. पाठलाग करून अखेर त्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पकडण्यात आले. पोलिसाला पकडण्यासाठी पोलिसांनाच कराव्या लागलेल्या धापपळीची चर्चा शहरात रंगली होती.

Web Title: Police Crime