पोलीस आणि गुन्हेगारांनी एकमेकांवर रोखले पिस्तूल!

Crime
Crime

औरंगाबाद - कुख्यात इम्रान मेहंदीला सोडवण्यासाठी साथीदारांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. त्याला सोडवण्याचा कट अनेक दिवसांपासून शिजलेला होताच. त्यानुसार न्यायालयाच्या दिशेने तवेरा व दुचाकी निघाल्या; पण पोलिसांनी वाहतूक कोंडी करून त्यांना घेरले. पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच शूटर्सनी पिस्तूलही रोखले; त्याच वेळी एका उपनिरीक्षकाने पिस्तूल रोखून प्रत्त्युत्तर दिले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी सर्वांच्या मुसक्‍या आवळल्या. यात मध्यप्रदेशचे सात शार्पशूटर आहेत. एखाद्या चित्रपटाला साजेसा प्रकार सोमवारी नारेगाव-गरवारे स्टेडियमदरम्यान घडला. 

इम्रानला न्यायालयात सुनावणीला नेताना अथवा परत कारागृहात नेताना पोलिसांवर हल्ला करून सोडवून नेण्याचा मेहंदी गॅंगचा मनसुबा असल्याची गोपनीय माहिती विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेला समजली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे व त्यांच्या पथकाने वर्कआऊट केले. पोलिसांना गाडी क्रमांकही मिळाला होता. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीगेट येथून तवेरा गाडीचा पाठलाग केला. ती नारेगाव येथे आल्यानंतर लगेचच या भागातील एका देशी दारूच्या दुकानासमोर दोघेजण दुचाकीवरून निघाले. एका खासगी वाहनात निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासोबत चार अधिकारी बसले होते. नारेगावातून वाहन निघताच गुन्हे शाखेचे सय्यद अश्रफ व नितीन धुळे यांनी टीप दिली. त्यानंतर पोलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. गरवारे स्टेडियमपासून काही अंतरावर रस्त्यावर दोन मोठी वाहने आडवी लावून रस्ता ब्लॉक केला. यामुळे मागून व समोरून संशयितांच्या दोन दुचाकी व तवेरा ही वाहने अडली गेली.

पोलिसांनीच कोंडी केल्याचे लक्षात येताच एका आरोपीने पिस्तुल रोखले. त्यावर पोलिसांनीही प्रत्युत्तर देत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. हा सर्व थरार मेहंदीला कारागृहातून बाहेर काढण्यापूर्वीच घडला. 

ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, घनशाम सोनवणे, अमोल देशमुख, अनिल वाघ, नंदकुमार भंडारी, सुभाष शेळके, नितीन मोरे, विजयानंद गवळी, मनोज चव्हाण, अशरफ सय्यद, संतोष सूर्यवंशी, हकीम पटेल, सिद्धार्थ थोरात, शिवाजी भळोसले, दत्ता गडेकर आदींनी केली.

अटकेतील संशयितांची नावे
सरूफखान शकूरखान (वय ४५), नफीसखान मकसूदखान (वय ४०), नकीबखान रयाज मोहम्मद (वय ५५), फरीदखान मन्सूरखान (वय ३५), शब्बीरखान समदखान (वय ३२), फैज्जुल्ला गणीखान (वय ३७), शाकीरखान कुर्बानखान (वय ४०) अशी मध्य प्रदेशातील शार्पशूटरची नावे आहेत. तसेच शेख यासेर शेख कादर (वय २३, रा. कौसर पार्क, नारेगाव, औरंगाबाद), सय्यद फैसल सय्यद एजाज (वय १८, रा. किलेअर्क, औरंगाबाद), मोहम्मद नासेर मोहम्मद फारूक (वय २४, रा. चंपा चौक, औरंगाबाद), मोहम्मद शोएब मोहम्मद सादेक (वय २८, रा. जाहेदनगर) अशी ११ संशयितांची नावे आहेत.

एसआयटीची भूमिका 
कुरेशी खून प्रकरणात तत्कालीन आयुक्त संजय कुमार यांनी एसआयटी स्थापन केले होते. यात उपायुक्त जय जाधव, सहायक आयुक्त संदीप भाजीभाकरे, निरीक्षक रामेश्‍वर थोरात, त्यावेळचे सायबर सेलचे व आता एटीएसमध्ये कार्यरत निरीक्षक अविनाश आघाव, तसेच गौतम पातारे यांचा समावेश होता. 

डायरी बोलली
निरीक्षक अविनाश आघाव व गौतम पातारे यांनी इम्रान मेहंदीची घरझडती घेतली, त्यावेळी त्याच्या पत्नीची डायरी त्यांच्या हाती लागली. कुरेशी यांच्या खुनाची सुपारी व आर्थिक व्यवहाराबाबत डायरीत माहिती होती. 

यांनी रचला होता कट
जामिनावर असलेला हबीब खालेद मोहम्मद ऊर्फ खालेद चाऊस (वय ३५, रा. टाइम्स कॉलनी) व मोहम्मद शोएब मोहम्मद सादेक यांनी इम्रान मेहंदी याची सुटका करण्याचा कट रचला होता. त्यांनीच मध्य प्रदेशातील शार्पशूटरला बोलावले होते.

मेहंदीला सोडविण्याचा उधळला कट!
मध्य प्रदेशच्या सात शार्पशूटरसह अकरा अटकेत
पिस्तुलाच्या धाकावर पोलिसांवर करणार होते हल्ला
नारेगाव-गरवारे स्टेडियमदरम्यान फिल्मी स्टाईल थरार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com