हिंगोली : वीज कंपनीच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

पोलिसांनी वीज कंपनीचे उपयोगी अभियंता डी.ई. पीसे,  कनिष्ठ अभियंता तारे यांच्यासह प्रतिभा इलेक्ट्रिकल्सच्या कंपनीच्या कर्मचार्‍याविरूद्ध शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे एका सर्वे कामात मंजूर झालेले रोहित्र इतर शेतकऱ्यांच्या शेतात बसवणार्‍या वीज कंपनीच्या कंत्राटदारास सह वीज कंपनीच्या अभियंत्याविरुद्ध बुधवारी (ता. २) बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील बासंबा येथे प्रभाकर नारायणराव मुंडे यांच्या शेतात विद्युत रोहित्र बसण्याची जागा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार कामाचे अंदाजपत्रक तयार करून कार्यारंभ आदेश देखील दिले होते मात्र वीज कंपनीने नियुक्त केलेल्या आंबेजोगाई येथील प्रतिभा इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या कंत्राटदाराने मुंडे यांच्या शेतात रोहित्र बसविण्या ऐवजी इतर ठिकाणीच रोहित्र बसवले. यामुळे मुंडे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बासंबा पोलीस ठाण्यात दिली आहे.

यावरून पोलिसांनी वीज कंपनीचे उपयोगी अभियंता डी.ई. पीसे,  कनिष्ठ अभियंता तारे यांच्यासह प्रतिभा इलेक्ट्रिकल्सच्या कंपनीच्या कर्मचार्‍याविरूद्ध शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बासंबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सरदार सिंह ठाकूर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: police filed case against mahavitran employee

टॅग्स