पोलिस दलाचे नियोजन ठरले प्रभावी 

पोलिस दलाचे नियोजन ठरले प्रभावी 

बीड - निवडणुका म्हटले की, बीड जिल्ह्यात राडा होण्याच्या घटना पूर्वी घडत. अनेकदा मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे प्रकारही घडलेले आहेत. मात्र तत्कालीन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी निवडणुकांच्या काळात योग्य पद्धतीने बंदोबस्ताचे नियोजन केल्याने व प्रतिबंधात्मक कारवाया वाढविल्याने मतदानादरम्यानच्या गैरप्रकारास आळा बसला. रेड्डी यांच्यानंतर पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनीदेखील योग्य नियोजन साधले. तोच कित्ता सध्याचे पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी गिरविल्याने यावेळच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत पार पडल्या. यात कायदा सुव्यवस्था पारदर्शकतेमुळे जिल्ह्याची प्रतिमा सुधारण्यास मदत होणार आहे. 

तत्कालीन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या कार्यकाळात लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. बीड जिल्ह्यात बूथ कॅप्चरिंग, मारामाऱ्या, बोगस मतदान, मतदान केंद्रावर दशहत निर्माण करणे यांसारख्या घटना यापूर्वीच्या निवडणुकींत घडलेल्या होत्या. त्यामुळे अधीक्षक रेड्डी यांच्यासमोर निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान होते. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी असतो. मतदानाच्या दिवशी दुपारनंतर काही ठिकाणी बूथ कॅप्चरिंग होत असल्याची बाब हेरली गेली. त्यामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयात 11 कर्मचारी मतदानाचा आढावा घेण्यासाठी नियुक्‍त करण्यात आले. त्यांच्याद्वारे तसेच नियंत्रण कक्षातील कर्मचारी अन्‌ मतदान केंद्रावर नियुक्‍त करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधण्यात आला. मोबाईलवर दर तासाला घेतलेला परिस्थितीचा आढावा, आपत्कालीन परिस्थितीत एका कॉलवर पाच मिनिटांत फौजफाटा प्रत्यक्ष स्पॉटला पोहोचेल, असे नियोजन केले गेल्याने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला. याचा सकारात्मक परिणाम निवडणुका शांततेत होण्यात दिसून आला. अधीक्षक रेड्डी यांनी आखलेल्या योजनांची पुनरावृत्ती आता प्रत्येक निवडणुकांमध्ये करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यात अधिकाधिक कल्पकता लढविली गेल्याने निवडणुकीत कोणताही गोंधळ झाला नाही. याउलट आचारसंहितेचा भंग अन्‌ मतदानाच्या दिवशीचा गोंधळ अंगलट येऊ शकतो, याबाबत जागृती केली गेल्याने बोगस मतदान अन इतर गैरप्रकारास आळा घालण्यात पोलिस दलाला यश मिळाले आहे. 

"ऑल आऊट ऑपरेशन'चा धसका 
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची बीडमध्ये बदली करण्यात आली. त्यामुळे निवडणुका शांततेत पार पाडण्याचे त्यांच्यासमोर आव्हान होते. त्यांनी हे आव्हान स्वीकारत नागपूर जिल्ह्याच्या धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक कालावधीत "ऑल आऊट ऑपरेशन' राबविले. त्यामुळे रात्री तसेच पहाटेच्यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर दिसून आला. मतदानाच्या ठिकाणी ऐनवेळी गोंधळ निर्माण झाला तर काय करावे? याची तयारी म्हणून प्रात्यक्षिकही करण्यात आले. याचा सराईत गुन्हेगारांसह इतरांनी धसका घेतला. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन करीत चांगला होमवर्क केला. त्यांना अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, गणेश गावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, एस.डी. नरवाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमखांचे सहयोग मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com