निलंग्याच्या पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

लातूर - निलंगा तालुक्‍यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले अवैध धंदे पाहता तेथील पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, तेथे लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे. 

लातूर - निलंगा तालुक्‍यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले अवैध धंदे पाहता तेथील पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, तेथे लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे. 

पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यास सुरवात केली आहे. एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून छापे टाकायला लावण्याची पद्धत त्यांनी अवलंबली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे. शहरात तर गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत मटका "गुरुजी‘ला हद्दपार करण्याची कारवाई डॉ. राठोड यांनी केली. आतापर्यंत कोणत्याही अधीक्षकांनी अशी कारवाई केली नव्हती. "गुरुजी‘ हद्दपार झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांची "लक्ष्मी‘ची आवकही थांबली होती. 

निलंगा तालुक्‍यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंदे वाढले होते. हे लक्षात आल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी निलंगा तालुक्‍यात जाऊन छापे टाकले होते. तेथील पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासाठी हा निर्वाणीचाच इशारा होता, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी पुन्हा जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी निलंग्यात दोन ठिकाणी जुगारावर छापे टाकले. वारंवार सांगूनही अवैध धंदे बंद होत नसल्याने अखेर पोलिस निरीक्षक पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना पोलिस कल्याण विभाग दाखविण्यात आला आहे. त्यांच्या जागी येथील ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे. निलंगा तालुका हा राज्याचे कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या ठिकाणी अवैध धंदे चालणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे श्री. सुपेकर कशा पद्धतीने काम करतात याकडे आता लक्ष लागले आहे. येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक मिलिंद खोडवे यांना ग्रामीण पोलिस ठाणे देण्यात आले आहे.

Web Title: police inspector dismiss