आयुक्तांच्या दरबारात पोलिसांच्या प्रश्‍नांवर झाले धडाधड निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

औरंगाबाद - पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संमेलनात (दरबार) पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी धडाधड निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. वेळेच्या आत प्रश्‍न सुटले पाहिजेत अशी तंबी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दिली. पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनो आळस झटका, कामे करा आणि बक्षिसे (रिवॉर्ड) मिळवा अशी ऑफर देतानाच, भ्रष्टाचार करू नका, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

औरंगाबाद - पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संमेलनात (दरबार) पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी धडाधड निर्णय घेत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. वेळेच्या आत प्रश्‍न सुटले पाहिजेत अशी तंबी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दिली. पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनो आळस झटका, कामे करा आणि बक्षिसे (रिवॉर्ड) मिळवा अशी ऑफर देतानाच, भ्रष्टाचार करू नका, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी (ता. आठ) भव्य मंडपात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पहिल्यांदाच संमेलन भरवण्यात आले. यावेळी सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, गोवर्धन कोळेकर, निरीक्षक मधुकर सावंत यांची मुख्य उपस्थिती होती. या संमेलनात 70 अधिकारी व साडेचारशे कर्मचारी उपस्थित होते. त्यापैकी 35 जणांनी आपल्या तक्रारी पोलिस आयुक्तांसमोर मांडल्या. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी विविध कारणे दाखवत बदलीसाठीची विनंती केली; मात्र आयुक्तांनी सर्वांच्याच बदलीची मागणी धुडकावून लावली. सर्व शहर दहा-पंधरा किलोमीटरच्या आत आहे, त्यामुळे बदल्या मागण्याची गरज नाही, आजारी असाल तर व्यायाम करा, योगासन करा, चांगला आहार घ्या अन्‌ आरोग्याची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी प्रत्येक शुक्रवारी थेट आपली भेट घेता येईल, यासाठी परवानगीची गरज राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अन्य अडचणी असतील, अन्याय होत असेल, त्यासाठी उपायुक्त (मुख्यालय) डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी प्रत्येक सोमवारी कर्मचाऱ्यांचा दरबार घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

कार्यालयीन कर्मचाऱ्यांना तंबी
पोलिसांची कामे रोखून धरणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना त्यांनी तंबीच दिली. नियमांचा पाढा वाचून कामे रोखणाऱ्यांना कारवाई करण्याचा इशारा दिला. कर्मचाऱ्याने भ्रष्टाचार केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिस कर्मचाऱ्यांचा कोणताही फंड, वेतन किंवा अन्य रकमा थांबता कामा नये. पोलिसांना त्यांच्या बक्षिसाची (रिवॉर्ड) रक्कम वेळेवरच मिळाली पाहिजे, अशी तंबीवजा सूचनाही त्यांनी केली. दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची तक्रार केली. आपल्या नावांमध्ये चुका केल्याचे सांगितले. त्यावर पोलिस आयुक्तांनी आजच हे काम झाले पाहिजे, असे स्पष्ट केल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने नावातील बदल दुरुस्तीची कार्यवाही सुरू केली. एका पोलिसाने तीसगाव येथील म्हाडाचे घर विकत घेतले; मात्र ताबा मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर पोलिस महासंचालक कार्यालयाशी आपण स्वत: बोलून हा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. अनेकांनी घर बांधण्यासाठी होम लोन, मुलाच्या शिक्षणासाठी लोनच्या अन्य कर्ज प्रकरणांशी संबंधित केलेले अर्ज तातडीने पोलिस महासंचालक कार्यालयाला पाठवून प्रश्‍न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करा, असे आदेश दिले.

अभियंत्याला हजर करा
हडकोच्या पोलिस वसाहतीतील घराच्या छतावरून पाणी गळती होते. तसेच ड्रेनेज लाइनचे पाणी घरासमोर साचत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून याबाबत लाइन हवालदाराकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, दुरुस्ती होत नसल्याची तक्रार आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी लाइन हवालदाराला धारेवर धरले. तेव्हा त्याने बांधकाम विभागाच्या अभियंत्याशी वारंवार संपर्क साधूनदेखील तो काम करत नसल्याची कैफियत मांडली. त्यावर मंगळवारी संबंधित अभियंत्याला आपल्यासमोर हजर करावे, असे आदेश दिले.

'जीपीएफ'मध्ये गैरव्यवहार
दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या जीपीएफच्या पैशात संबंधित कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यावर पोलिस आयुक्तांनी तक्रार समजावून घेत तक्रारदार पोलिस कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्याला शासकीय खर्चाने थेट नागपूरच्या जीपीएफ मुख्यालयात जाऊन प्रश्‍न सोडवण्याची मुभा दिली.

आज नागरिकांचा दरबार
पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी मंगळवारी (ता. नऊ) जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सिटी चौक पोलिस ठाणे येथे सायंकाळी चार ते सहा वाजेदरम्यान नागरिक - पोलिस संमेलन (जनता दरबार) आयोजित केला आहे. नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: police issue decission in commissioner meeting