उस्मानाबाद : तंबूत कंटेनर घुसल्याने पोलिस कर्मचारी व होमगार्डचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

येडशी : बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या तंबूत कंटेनर घुसल्याने पोलिस कर्मचारी व होमगार्ड, अशा दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात येडशी (ता. उस्मानाबाद) येथे महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ गुरुवारी (ता. 10) पहाटे तीनच्या सुमारास झाला.

येडशी : बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या तंबूत कंटेनर घुसल्याने पोलिस कर्मचारी व होमगार्ड, अशा दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात येडशी (ता. उस्मानाबाद) येथे महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ गुरुवारी (ता. 10) पहाटे तीनच्या सुमारास झाला.

यामध्ये एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला सोलापूरला हलविण्यात आले आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवात भाविकांना त्रास होऊ नये म्हणून येडशी येथील उड्डाणपूलावरून येरमाळ्याकडून येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यासाठी पोलिसांनी नवरात्र उत्सव ते पौर्णिमा या कालावधीत उड्डाणपुलावर बॅरिकेटिंग करून तंबू उभारला होता.

येथून सोलापूरकडे जाणारी वाहतूक बार्शी मार्गे तर हैदराबादकडे जाणारी अवजड वाहने लातूर मार्गे वळविण्यात येत होती. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास या ठिकाणी एक पोलिस व दोन होमगार्ड कर्तव्य बजावत होते. यावेळी येरमाळ्याकडून आलेला कंटेनर (एनएल 01 एए 0027) हा वेगाने साईड रस्त्याने न जाता पोलिसांच्या तंबूत घुसला.

यावेळी येथे कार्यरत असलेले होमगार्ड संतोष व्यंकट जोशी (रा. कळंब) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पोलिस कर्मचारी दीपक दिलीप नाईकवाडी (रा. तुळजापूर) यांचा उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या अपघातात होमगार्ड वसंत गगांधर गाडे (रा. कळंब) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले आहे.

अपघातानंतर चालक कंटनेर घेऊन निघून गेला, मात्र उस्मानाबादजवळ पोलिसांनी हा कंटनेर पकडला.
या घटनेची माहिती उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या अपघाची नोंद उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police personnel and homeguards die for accident