नागरिकांची सुरक्षा करणारे पोलिसच असुरक्षीत !

file photo
file photo

सोनपेठ (जि.परभणी):  ‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असल्यामुळे चोवीस तास रस्त्यावर फिरून नागरिकांना घराबाहेर पडू न देणे तसेच बाहेरील नागरिक कुठल्याही गावात येऊ नयेत म्हणून पोलिस प्रशासन झटत आहे. यामध्ये पूर्णवेळ रस्त्यावर राहून सेवा देणाऱ्या पोलिसांना एन ९५ मास्क, हँण्ड ग्लोज, सँनीटायझर व पूर्ण बाह्यांचे शर्ट मिळणे आवश्यक असून त्यांना पाणी व इतर सोयी पुरवणे गरजेचे आहे. नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये म्हणून धडपडणाऱ्या पोलिसांच्याच सुरक्षिततेसाठी कुठलीही उपाययोजना नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
 
नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये म्हणून प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात असल्या तरी, सोनपेठमधील काही नागरिकांना मात्र, याचे अजूनही गांभीर्य लक्षात येत नसल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वत्र ‘कोरोना’ने थैमान घातले असतांना परभणी जिल्ह्यासह सोनपेठ तालुक्यात मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप दिसला नसल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. मात्र, अजूनही धोका टळला नसल्यामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करून सामान्य प्रशासन व पोलिस प्रशासन मात्र दिवस रात्र झटत आहे.


 रोटरीच्या वतीने चहा पाण्याची व्यवस्था
सोनपेठ पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर फिरून नागरिकांना घराबाहेर न निघण्यासाठी आवाहन करत आहेत. ता.२४ रोजी शहरातील डॉ. गणेश मुंडे यांनी कर्फ्यूमध्ये काम करणाऱ्या पोलिसांना चहा आणि पाण्याची सोय करून दिली होती. तर ता.२५ पासून सोनपेठ रोटरी क्लबच्या वतीने पोलिसांच्या सोयीसाठी जागोजागी पाणी आणि चहाची व्यवस्था करून दिलेली आहे. 

हुल्लड बाजांमुळे पोलिस त्रस्त
सर्वत्र संचारबंदी असतांनादेखील शहरातील काही हुल्लडबाज मात्र, दवाखान्याचे व अजून काही कामे सांगून खुलेआम रस्त्यावर फिरत आहेत. सोनपेठ पोलिसांनी मात्र अशा रिकाम्या लोकांना काठीचा प्रसाद दिल्याचे पहावयास मिळते. पोलिस डोळ्याआड झाले की लगेच काहीजण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यात कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - ‘कोरोना’ इफेक्ट : मास्क लावून उभारल्या गुढ्या !


ग्रामस्थ अजूनही गप्पातच गुंग
‘कोरोना’ बाबत जगभर भीतीचे सावट असतांना तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र आजही ग्रामस्थ गप्पा मारण्यातच गुंग असल्याचे चित्र आहे. त्यातच आता प्रत्येक गावात पुणे मुंबई वरून आलेली मंडळीदेखील गावातील ग्रामस्थांना गोळा करून शहरातील व परदेशातील गप्पा ठोकत असल्यामुळे सरकार व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होत नाही. गावातील ग्रामस्थांना कोरोना बाबत कुठलेही गांभीर्य दिसून येत नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com