‘कुरिअर’वर पुन्हा छापा, सात शस्त्रे जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

औरंगाबाद - फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शस्त्रे खरेदीचा गुन्हे शाखेने सोमवारी (ता. २८) रात्री पर्दाफाश केला. त्यानंतर बुधवारी (ता. ३०) नागेश्वरवाडीस्थित कुरिअर कार्यालयात छापा घालून पार्सलद्वारे आलेली आणखी सात शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.

औरंगाबाद - फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शस्त्रे खरेदीचा गुन्हे शाखेने सोमवारी (ता. २८) रात्री पर्दाफाश केला. त्यानंतर बुधवारी (ता. ३०) नागेश्वरवाडीस्थित कुरिअर कार्यालयात छापा घालून पार्सलद्वारे आलेली आणखी सात शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.

नागेश्वरवाडीत इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पोलिसांनी बुधवारी दुपारी छापा घातला. यात औरंगाबादच्या ग्राहकांसाठी भिवंडी येथील पार्सल हबमधून फ्लिपकार्ट या कंपनीकडून पाठविण्यात आलेले शस्त्रांचे पार्सल पोलिसांनी जप्त केले. यात तलवारी व चाकूचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

तत्पूर्वी २४ जणांनी फ्लिपकार्टवरून तलवार व अन्य शस्त्रे मागविल्याचे पोलिस तपासातून उघड झाले होते. यात सोमवारी रात्री छापे घालून २८ शस्त्रे जप्त करण्यात आली होती. यात कुरिअर व्यवस्थापकासह सातजणांना पोलिसांनी अटक केली. उर्वरित सतरा संशयितांचे लोकेशन पोलिसांनी घेतले. त्यानंतर पुन्हा बुधवारी पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहायक निरीक्षक घनशाम सोनवणे, उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, साईनाथ महाडिक, सुभाष शेवाळे, संजय धुमाळ, सतीश हंबरडे, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, अफसर शहा, सय्यद अशरफ, सिद्धार्थ थोरात, नंदलाल चव्हाण, ओमप्रकाश बनकर, राहुल हिवराळे, नितीन धुळे, राजेंद्र चौधरी, मच्छिंद्र सोनवणे, रत्नाकर मस्के, शिवा बोर्डे यांनी केली.

आतापर्यंत ३८ शस्त्रे जप्त
गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत सुमारे ३८ शस्त्रे जप्त करण्यात आली. बुधवारी घातलेल्या छाप्यात पाच तलवार, एक जंबिया व दोनपाती धारदार चाकू जप्त करण्यात आले आहेत.

तपासासाठी भिवंडीत
औरंगाबादेत भिवंडीतून तलवारी आल्यानंतर आता तेथील इन्स्टाकार्टच्या कार्यालयात छापा घातला जाणार आहे. याबाबत औरंगाबाद व मुंबईतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चर्चाही झाली आहे. औरंगाबाद पोलिसांची दोन पथके भिवंडीत अधिक तपासासाठी रवाना होणार आहेत.

Web Title: police raid on courier