नांदेडला पोलिस भरतीतील रॅकेट उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नांदेड - पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षेत अवैध मार्गाचा अवलंब करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी "ओएमआर ऑपरेटर'सह वीस जणांवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापैकी 13 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी बुधवारी (ता. 25) पत्रकार परिषदेत दिली. 

नांदेड - पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षेत अवैध मार्गाचा अवलंब करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी "ओएमआर ऑपरेटर'सह वीस जणांवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापैकी 13 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी बुधवारी (ता. 25) पत्रकार परिषदेत दिली. 

उमेदवारांच्या लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पुणे येथील "एसएसजी सॉफ्टवेअर'कडे आहे. या कंपनीच्या "ओएमआर स्कॅनिंग मशीन ऑपरेटर'शी आर्थिक संधान बांधून हा गैरव्यवहार झाला आहे. मैदानी परीक्षेत चांगले गुण मिळविलेल्या काही उमेदवारांना लेखी परीक्षेत 90 ते 98 गुणे दिसले. अशा उमेदवारांनी काहीच लिहिले नव्हते. त्यांना गुण कसे मिळाले, याची चौकशी श्री. मीना यांनी केल्यानंतर रॅकेटचा भंडाफोड झाला. उमेदवारांनी प्रत्येकी साडेसात लाख रुपये या कंपनीच्या दलालांना दिले. जवळपास 25 लाख रुपयांचा व्यवहार औरंगाबाद येथील "आयआरबी' पथकातील पोलिस नामदेव ढाकणे यांच्यामार्फत झाला. लेखी परीक्षेत "ओएमआर ऑपरेटर'च्या मदतीने रिकाम्या जागी योग्य उत्तरे भरून घेऊन चांगले गुण प्राप्त केल्याचे भासविण्यात आले. पोलिस शिपाई पदासाठी गैरमार्गाचा अवलंब, खोट्या दस्तऐवजांद्वारे शासनाची दिशाभूल केल्याचे तपासणीअंती सिद्ध झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला. 

रॅकेटमधील संशयित 
हवालदार नामदेव बाबूराव ढाकणे (आयआरबी पथक, औरंगाबाद, रा. देऊळगाव राजा), शुक्राचार्य बबन टेकाळे (पोलिस, एसआरपीएफ ग्रुप कंपनी तीन, जालना, देऊळगाव राजा), शेख आगा (रा. रिसोड, जि. वाशीम), शिरीष अवधूत (एसएसजी सॉफ्टवेअर, सांगली), स्वप्नील दिलीप साळुंके (एसएसजी सॉफ्टवेअर, सांगली), प्रवीण भाटकर (ओएमआर ऑपरेटर, पुणे), दिनेश गजभारे (रा. नांदेड, ह.मु. पुणे). 

उमेदवार - ओंकार संजय गुरव (खानापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), कृष्णा काशीनाथ जाधव (सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा), शिवाजी श्रीकृष्ण चेके (सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा), कैलास काठोडे (सावखेड भोई, ता. देऊळगावराजा), आकाश दिलीप वाघमारे (सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा), सलीम महंमद शेख (तोंडगाव, ता. जि. वाशीम), समाधान सुखदेव मस्के, किरणअप्पा मस्के (दोघे गिरवली, ता. देऊळगाव राजा), सुमित दिनकर शिंदे (येवती, ता. रिसोड), मुखीद मकसूद अब्दुल (जिंतूर, जि. परभणी), हनुमान मदन भिसाडे (रिसोड, जि. वाशीम), रामदास माधवराव भालेराव (बहादरपुरा, ता. कंधार), संतोष माधवराव तनपुरे (नांदुरा, जि. हिंगोली). 

Web Title: police recruitment racket in nanded