पोलिसांच्या दंडुक्‍यांनाही चोरीचे भय!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

औरंगाबाद - पोलिस म्हटले, की दरारा आणि वचक हे स्वभावगुण दिसून येतात; परंतु पोलिसांनाही चोरी होण्याची भीती वाटत असेल तर! होय, ही बाब खरी आहे. दंडुके चोरी जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी चक्क दुचाकीला ते कुलूप व साखळदंडात बांधून ठेवल्याचा अजब प्रकार बुधवारी (ता.११) मध्यवर्ती बसस्थानकात समोर आला.  

पोलिस विभागात सहायक फौजदारापासून शिपायापर्यंत अस्त्र म्हणून दंडा अथवा दंडुका देण्यात येतो. तसा या पोलिसांसाठी दंडा भूषणावह आहेच. या दंड्याचा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाचा असतो. एक दंडा पडला तर भल्या-भल्यांची पळता भुई थोडी होते आणि चार ते पाच दिवस पोलिसांनी मारलेला दंडा आठवतच राहतो. दंड्याचे वळही मग स्वस्थ बसू देत नाहीत. दंगल, अतिक्रमणविरोधी कारवाई, मोर्चे आंदोलनावेळी अनेकांना या दंड्यांचा प्रसाद मिळालेला आहे. या दंड्याची वचक एवढी, की तो उगारताच आई गं...हा शब्द नक्कीच तोंडून पडलाच म्हणून समजा.

मनात येईल तेव्हा हा दंडा अनेकांना पीडा देऊ शकतो. ग्रामीण भागात तर हैदोस, धुडगूस घालणाऱ्यांना, कायदा मोडणाऱ्यांना या दंड्याची वारंवार अनुभूती येते. परंतु या दंड्यालाही चोरीचे भय आहे. हे ऐकून तुम्ही थबकला असाल; पण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात दंडे चक्क साखळदंडात दुचाकीला कुलूप लावलेल्या अवस्थेत बांधलेले दिसले. कुतूहल म्हणून पोलिसांना विचारताच त्यांनी यापूर्वीचे अनुभव कथन केले. ‘‘आमचे दोन दंडे चोरी गेले हो... काय करणार...अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा सांगितली! यापूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन दंडे चोरी होऊ नये म्हणून कुलूपबंद ठेवतोच, असे त्या पोलिसांनी सांगितल्यानंतर दंडेही चोरांचे टार्गेट होतात आणि पोलिसांनाही चोरीचे भय असते, हे या उदाहरणावरून दिसून आले.

Web Title: police stick theft crime criminal