बुलेटप्रूफ जॅकेटविना पोलिसांची जिवाची बाजी 

उमेश वाघमारे 
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जालना : सशस्र गुन्हेगारांना रोखताना स्थिती गंभीर 

जालना -  सामान्य नागरिकांपासून ते व्हीआयपींपर्यंत सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे; परंतु सर्वांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेकडे मात्र गृहविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोलिसांचे सुरक्षा कवच असणारे बुलेटप्रूफ जॅकेटच जिल्ह्यात उपलब्ध नाहीत. परिणामी बुलेटप्रूफ जॅकेटविनाच जिल्ह्यातील पोलिसांना जीव धोक्‍यात घालून धाडसी कारवाया करण्याची वेळ येत आहे. 

जालना जिल्हा कायदा-सुव्यवस्थेबाबत राज्यात तसा शांत जिल्हा म्हणून परिचित आहे; मात्र अलीकडच्या काळात जिल्ह्यात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील सराईत गुन्हेगारांचा वावर वाढल्याचे चित्र आहे. मागील साडेआठ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल सहा गावठी पिस्टल जप्त केल्या आहेत. त्यापैकी स्थानिक गुन्हे शाखेने पाच, तर "एडीएस'ने एक पिस्तूल जप्त केली आहे. तर दहा तलवारी, तीन चाकू, एक रामपुरी, एक कोयता अशी शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे गुन्हेगार पिस्तूल, तलवारी, खंजिर आशा हत्यारांचा वापर करीत असताना त्यांचा सामाना करताना पोलिसांकडे बुलेटप्रूफ जॅकेट असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यात बुलेटप्रूफ जॅकेटच उपलब्ध नाहीत. 2017 पासून आतापर्यंत कारवाईसाठी गेलेल्या पथकावर चार ते पाचवेळा गुन्हेगारांकडून जीवघेणे हल्ले झाले आहेत. ता. एक सप्टेंबर रोजी तर गुन्हेगारांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर पिस्तूल रोखले होते; तसेच खंजिरने हल्लाही केला होता. परिमाणी बुलेटप्रूफ जॅकेटविना पोलिसांना जिवावर उदार होऊन धाडसी कारवाया करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गृहविभागाने पोलिसांच्या सुरक्षेचा विचार करून प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांना बुलेटप्रूफ जॅकेट देणे ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 

अनेकदा पोलिसांवर जीवघेणा हल्ला 
पोलिसांवर कारवाईदरम्यान चार ते पाचवेळा जीवघेणा हल्ला झाला आहे. ता. एक सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका लॉजवर सहा शस्त्रधाऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. यावेळी गुन्हेगारांनी पोलिसांवर चक्क गावठी पिस्तूल रोखले होते. तर एका गुन्हेगाराने पथकातील कर्मचाऱ्यांवर खंजिराने हल्ला चढविला होता. ऑगस्ट 2017 मध्ये सराईत गुन्हेगार तान्या ऊर्फ विक्की जाधव याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर तलवारीने हल्ला केला होता. तर गतवर्षी कोंम्बिंगदरम्यान शिकलकरी मोहल्ला येथे एका संशयिताने पोलिसावर हल्ला केला होता. मात्र, या सर्व हल्ल्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रसंगावधान राखल्याने बचावले. त्यामुळे आता तरी पोलिसांनी बुलेटप्रूफ जॅकेट उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 

चेकपोस्टवर सुरक्षेचा प्रश्‍न 
विधानसभा निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील सीमा भागात आठ ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांकडेही बुलेटप्रूफ जॅकेट नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाकडे बुलेटप्रूफ जॅकेट उपलब्ध नाहीत; परंतु यासंदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार बुलेटप्रूफ जॅकेटची मागणी केली जाणार आहे. 
- चैतन्य एस.
पोलिस अधीक्षक, जालना 
----- 
अवैध पिस्तूल, तलवारी, खंजिरसंदर्भात खबऱ्यामार्फत माहिती काढून सतत कारवाई केली जाते. यापुढेही अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांसह सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. 
- राजेंद्रसिंह गौर
पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police without bullet proof jacket