सलग दुसऱ्या दिवशी पोलिस लाचेच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - सातारा पोलिस ठाण्याचा सहायक फौजदार लाचेच्या सापळ्यात अडकल्यानंतर सिटी चौक ठाण्याच्या पोलिस नाईकाला अडीच हजारांची लाच घेताना पकडले. वाळू वाहतुकीच्या वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी त्याने ही लाच घेतली. होनाजीनगर येथे त्याच्याच घराजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. १३) ही कारवाई केली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सुनील नारायणराव जहागीरदार (वय ४८, रा. श्रीपाद कॉलनी, होनाजीनगर, जटवाडा रोड) असे संशयित पोलिसाचे नाव आहे. ते सिटी चौक पोलिस ठाण्यात रुजू आहेत. लाच प्रकरणातील तक्रारदाराचा शेती, तसेच वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे वाळू वाहतुकीसाठी एक ट्रॅक्‍टर व टेंपो असून ऑर्डरप्रमाणे ते वाळू वाहतूक करतात. त्यांच्या वाहनांची वाहतूक सिटी चौक पोलिस ठाणे हद्दीतून होते. त्यामुळे या ठाण्याचा पोलिस नाईक सुनील जहागीरदार याने तक्रारदाराला वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिस कारवाई न करण्यासाठी 
प्रति महिना साडेतीन हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. याविरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर पथकाने लाचेची पडताळणी केली असता, तडजोडीअंती अडीच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम होनाजीनगर, जटवाडा येथे देण्याचेही सांगितले. त्यानुसार पथकाने होनाजीनगर येथे सापळा रचला व तक्रारदाराकडून अडीच हजार रुपये घेताना पकडले. जहागीरदारविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई उपअधीक्षक नितीन देशमुख, जालना येथील उपअधीक्षक श्री. निकाळजे यांच्या पथकांनी केली.

Web Title: Polie Bribe Crime