शहरात 84 टक्के बालकांना पोलिओ डोस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

औरंगाबाद - पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (ता. 29) शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात एकूण 1 लाख 66 हजार 293 म्हणजेच 84 टक्के बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले. 

औरंगाबाद - पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (ता. 29) शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात एकूण 1 लाख 66 हजार 293 म्हणजेच 84 टक्के बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले. 
शहरातील एकही बालक पोलिओ डोसविना राहू नये, यासाठी रेल्वेस्टेशन, मुख्य बसस्थानक, लक्‍झरी बसस्थानक शहानूरमियॉं दर्गा येथे रात्रीही पोलिओ डोस पाजण्यासाठी बुथ तैनात होते. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्‌घाटन सिद्धार्थ उद्यानात सकाळी जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, आरोग्य सेवा राज्य निरीक्षक डॉ. दिलीप पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक जी. एम. गायकवाड, पालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास जगताप यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उद्यान अधीक्षक विजय पाटील, डॉ. संध्या टाकळकर, डॉ. नीता पाडळकर, पोलिओ लसीकरण मोहीम प्रमुख डॉ. उज्वला भामरे यांनी बालकांना पोलिओ डोस पाजून या मोहिमेचा प्रारंभ केला. 

614 बुथवर शून्य ते सहा वयोगटातील बालकांना डोस 
मोहिमेअंतर्गत पालिका कार्यक्षेत्रातील 1 लाख 96 हजार 839 बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. सकाळी आठ वाजेपासूनच शहरात 614 बुथवर शून्य ते सहा वयोगटातील बालकांना डोस पाजण्यास सुरवात झाली. दुपारपर्यंत 1 लाख 16 हजार बालकांना डोस पाजण्यात आले होते. सायंकाळी ही आकडेवारी 1 लाख 66 हजार 293 वर गेली. एकूण 84 टक्के बालकांना मोहिमेच्या दिवशी डोस पाजण्यात आले. 
 
सार्वजनिक ठिकाणी पालिकेचे जास्तीचे बुथ 
उद्दिष्टपूर्तीसाठी टोल नाक्‍यासह सार्वजनिक ठिकाणी पालिकेने जास्तीचे बुथ तयार केले होते. यावेळी प्रथमच महापालिकेतर्फे शहरात रात्री येणाऱ्या मुलांना डोस पाजण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार मध्यवर्ती बसस्थानकात एक पथक, रेल्वेस्टेशनला एक आणि खासगी बसने प्रवास करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना पोलिओ डोस देण्यासाठी शहरातील शहरानूरवाडी येथील टर्मिनलवर अशा ठिकाणी प्रत्येकी एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत डोस पाजण्यात येत होते. दुसऱ्या दिवशी शहरभरात घरोघर जाऊन पालिकेचे कर्मचारी लहान बालकांची विचारणा करून पोलिओ डोस पाजणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी दिली. 
 

Web Title: polio vaccine for children