जालना जिल्ह्यात राजकीय वातावरण गरम 

भास्कर बलखंडे 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

जालना - जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आक्रमक पध्दतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. या निवडणुकीत प्रचारसभेत तिन्ही पक्ष एकमेकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यात एकहाती सत्ता देण्याचे साकडे मतदारांना घातले जात आहे. 

जालना - जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आक्रमक पध्दतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. या निवडणुकीत प्रचारसभेत तिन्ही पक्ष एकमेकांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यात एकहाती सत्ता देण्याचे साकडे मतदारांना घातले जात आहे. 

एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात गटनिहाय प्रचारसभा घेण्यात येत आहेत. या सभांमधून श्री. खोतकर यांच्यासह पक्षाचे उपनेते लक्ष्मण वडले, माजी आमदार शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे आदी नेत्यांनी भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसला जोरदार लक्ष्य केले आहे.केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी पुरेसा खचला आहे,त्यांना उभे करण्याचे काम येणाऱ्या काळात शिवसेना करणार आहे.त्यामुळे जिल्हा परिषद, पालिकेची सत्ता शिवसेनेच्या हातात द्यावी, असे आवाहन शिवसेनेने विविध ठिकाणी घेतलेल्या मतदारांना केले आहे. शिवसेनेतर्फे अतिशय आक्रमक पद्धतीने प्रचारयंत्रणा राबविण्यात येत आहे.जिल्हाभरात प्रचाराची राळ उठली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्यामुळे प्रचारात आता हळूहळू रंग भरू लागला आहे. 

जिल्हा परिषदेच्या 56 जागांवर शिवसेना आणि भाजप वेगळे लढत आहेत. दोन्ही पक्षांनी स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली केल्या आहेत.त्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जाफराबाद आणि भोकरदन या ठिकाणी प्रचारसभा झाल्या.या सभेमध्ये भाजपवर निशाणा साधला. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्‍वासने दिली गेली परंतु सत्ता मिळाल्यानंतर मात्री ती पूर्ण न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला उठाव नसल्याचा आरोप श्री. अंबेकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेच्या हाती एकहाती सत्ता द्यावी, असे आवाहन त्यांनी सभेमधून केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आक्रमक प्रचार 
दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस आघाडीच्या वतीनेही अतिशय आक्रमक पध्दतीने प्रचार सुरू करण्यात आला आहे. माजी मंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली गटनिहाय प्रचारसभा होत आहेत. या प्रचारसभांमधून भाजप, शिवसेना यांच्यावर टीका केली जात आहे. गेल्या वीस वर्षापासून भाजप-शिवसेना जिल्हा परिषदेत सत्तेवर असताना जिल्ह्यात कोणता विकास झाला, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे ते सैरभैर आहेत. शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा होण्याची गरज आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीच्या हाती सत्ता द्यावी, असे आवाहन केले जात आहे. प्रचारसभांमध्ये श्री. टोपे यांच्यासह माजी उपाध्यक्ष सतीश टोपे, डॉ. निस्सार देशमुख यांचाही सहभाग राहत आहे. एकूणच जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस - आघाडीकडून प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. 

Web Title: political ambience in jalna