मुख्यमंत्री-ऊर्जामंत्र्यांच्या वादात अडकला केंद्रेकरांचा पदभार

प्रकाश बनकर
शुक्रवार, 12 मे 2017

केंद्रेकरांच्या कार्याची शैली सर्वांना माहिती असल्यामुळे महावितरणमधील कामचुकारांना चांगलाच धसका बसला आहे. मात्र ऊर्जामंत्र्यांना केंद्रेकरांची बदली खटकल्यामुळे वरिष्ठ पातळीवर चांगलेच राजकारण सुरू झाले आहे. यामुळेच केंद्रेकरांनी पदभार स्वीकारलेला नाही

औरंगाबाद - महावितरण प्रादेशिक कार्यालयाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुनील केंद्रेकर यांची 22 एप्रिलला बदली झाली. दोन दिवसांनंतर सिडकोचे प्रशासक पद त्यांनी सोडले मात्र अद्याप नव्या पदाचा पदभार स्वीकारलेला नाही. ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातील वादामुळेच केंद्रेकरांनी पदभार घेतला नसल्याची चर्चा सुरू आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विरोधानंतरही राज्यात तीन प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्यात आली. मात्र आता व्यवस्थापकीय संचालकपदावरून राजकारण सुरू झाले आहे.

महावितरणतर्फे मराठवाड्यातील आठ आणि खांदेशातील तीन, अशा 11 जिल्ह्यांच्या वीज वितरण प्रणालीत सुधारणा करणे, वसुली वाढविणे व वीज गळती कमी करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयाची स्थापना करण्यात आली. ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मराठवाडा आणि विदर्भ आणि खांदेश या भागांत मोठ्या प्रमाणावर वीजगळती, वीजचोरी आणि थकबाकी आहे. थकबाकी वसूल करणे, महावितरणच्या सुविधा- सेवा सुधारणे, परिमंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी ही कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. यासाठी विदर्भातील प्रादेशिक कार्यालयाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ऊर्जामंत्र्यांच्या मर्जीतील मुख्य अभियंत्याची निवड करण्यात आली तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचा प्रभारी पदभार ताकसांडे यांच्याकडे देण्यात आला होता.22 एप्रिलला राज्यातील 31 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सुनील केंद्रेकर यांची महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली. केंद्रेकरांच्या कार्याची शैली सर्वांना माहिती असल्यामुळे महावितरणमधील कामचुकारांना चांगलाच धसका बसला आहे. मात्र ऊर्जामंत्र्यांना केंद्रेकरांची बदली खटकल्यामुळे वरिष्ठ पातळीवर चांगलेच राजकारण सुरू झाले आहे. यामुळेच केंद्रेकरांनी पदभार स्वीकारलेला नाही. महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऊर्जामंत्र्यांना औरंगाबादच्या प्रादेशिक कार्यालयाच्या संचालकपदी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना बसवायचे होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी केंद्रेकरांची या जागेवर बदली केल्यामुळे नाराजी असल्याची माहिती "सकाळ'ला दिली.

कार्यालय सजले पण...
प्रादेशिक कार्यालयाचा पदभार सुनील केंद्रेकर स्वीकारणार असल्यामुळे त्यांच्या दालनाची अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्यात आली. नवीन खुर्च्या, एसी यासह केंद्रेकरांच्या स्वागतासाठी दालन सज्ज ठेवण्यात आले आहे. मात्र केंद्रेकरांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही.

Web Title: politics in aurangabad