औरंगाबाद : राज्यातील घडामोडींनी बदलणार महापालिकेतील समीकरणे

माधव इतबारे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

एप्रिल 2020 मध्ये होणारी महापालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार

औरंगाबाद - मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महापालिकेत गेल्यावेळी शिवसेनेने 28 जागांवर विजय मिळवत सर्वांत मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळविला होता; मात्र तो युतीत. यावेळी मात्र भाजपची नव्हे तर शहरात फारसा जनाधार नसलेल्या कॉंग्रेस
आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सोबत शिवसेनेला घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, एप्रिल 2020 मध्ये होणारी महापालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार असल्यामुळे युतीचे नगरसेवक हवालदिल झाल्याचे चित्र आहे. 

शिवसेना-भाजप युतीचे 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच बिनसले. भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत शिवसेनेसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली. प्रचारात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर जहरी टीका केल्यामुळे दोन्ही पक्षातील संबंध अधिकच ताणले गेले. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीतही युती होणार नाही, असा कयास लावला गेला; पण 2014 च्या निवडणुकीनंतरच भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र आले व एमआयएमच्या पक्षाच्या धास्तीमुळे 2015 मध्ये महापालिकेची निवडणूकही युतीत लढली गेली. औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक 28 जागा जिंकत वर्चस्व मिळविले.

- शिवसेना एनडीएतून बाहेर; अरविंद सावंत यांचा राजीनामा सुपूर्द 

त्यापाठोपाठ एमआयएमने 25 जागांवर विजय मिळविला. भाजप मात्र 23 जागांवरच अडकली. मात्र, सोबत असलेल्या अपक्ष नगरसेवकांची वेगळी आघाडी करून भाजपने खेळी खेळत महापालिकेतील अनेक पदे मिळविली. सुरवातीला दीड वर्षे महापौरपद शिवसेनेला, त्यानंतर एक वर्षे भाजप व शेवटचे अडीच वर्षे पुन्हा शिवसेनेला महापौरपद देण्यात आले. तसेच स्थायी समिती सभापतिपद पाच वर्षांपैकी तीन वर्षे भाजपकडे तर दोन वर्षे शिवसेनेकडे ठरले होते.

- राष्ट्रवादी पर्यायी सरकार बनविण्यास तयार, काँग्रेसच्या निर्णयाची वाट : मलिक

ठरल्याप्रमाणे पदांचे वाटपही झाले; मात्र विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपत आलेला असताना युतीत आता फारकत झाली. एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र 25 वर्षे जुना मित्र भाजप व शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणार असे वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रभाग रचनेनुसार महापालिकेची निवडणूक होणार आहे. एका प्रभागात चार वॉर्डाचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवारांना सध्याच्या चार वॉर्डांमध्ये प्रचार करावा लागणार आहे. प्रभागामुळे आधीच गोंधळाचे वातावरण असताना त्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याने इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकही हवालदिल झाले आहेत. 

महाराष्ट्रात कधी, का लागली होती राष्ट्रपती राजवट? जाणून घ्या... 
 

असे आहे पक्षीय बलाबल
शिवसेना 28 
भाजप 23 
एमआयएम 24 
कॉंग्रेस 12 
अपक्ष अपक्ष
बसप 04 
रिपाइं (डे) 02 
एकूण 115 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics of Aurangabad Municipal Corporation