AMC : आयुक्त मिळाले; पण राजकारण पेटले

माधव इतबारे
शनिवार, 14 डिसेंबर 2019

शासनाने आस्तिककुमार पांडेय यांची आयुक्त म्हणून बदली केली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रलंबित विकासकामे तातडीने करून घेण्याची गरज असताना, दोन्ही पक्षांतील राजकारण शुक्रवारच्या (ता. 13) सर्वसाधारण सभेत चांगलेच पेटले.

औरंगाबाद - महापालिकेला कायम आयुक्त नसल्याने शहरातील विकासकामे ठप्प असल्याचा आव गेल्या दीड महिन्यापासून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपचे पदाधिकारी आणत होते. शासनाने आस्तिककुमार पांडेय यांची आयुक्त म्हणून बदली केली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रलंबित विकासकामे तातडीने करून घेण्याची गरज असताना, दोन्ही पक्षांतील राजकारण शुक्रवारच्या (ता. 13) सर्वसाधारण सभेत चांगलेच पेटले. एकमेकांवर कुरघोडी करण्यातच अधिक वेळ खर्ची पडल्याने शहराच्या विकासासाठी दोन्ही पक्षांची तळमळ किती बेगडी आहे, हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. 

महापालिकेची 2015 मधील निवडणूक शिवसेना-भाजपने युतीच्या माध्यमातून लढविली होती. त्यानुसार महत्त्वाची पदे वाटून घेऊन साडेचार वर्षे कारभार केला; मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलले. भाजप विरोधी पक्षात, तर शिवसेना सत्ताधारी झाली आहे. त्यामुळे शहराचे राजकारणही बदलले आहे. कालपर्यंत एकत्र बसून निर्णय घेणारे हे दोन्ही पक्ष आता एकमेकांवर कुरघोड्या करण्यात मग्न झाले आहेत.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

विशेष म्हणजे महापालिका निवडणुका तोंडावर असताना. तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक दीड महिन्याच्या दीर्घ सुटीवर गेल्यानंतर शासनाने प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे पदभार दिला; मात्र त्यांनी महापालिकेला एकही भेट दिली नाही व फाइलवर सह्याही केल्या नाहीत. त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित पडली आहेत. दोनशे ते अडीचशे फायलींचा गठ्ठा आयुक्तांच्या सहीविना पडून होता. त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधींनी राज्य शासन, राज्यपालांकडे नियमित आयुक्त देण्याची मागणी केली.

आस्तिककुमार पांडेय यांची शासनाने बदलीही केली. कालपर्यंत शहरातील विकासकामे ठप्प असल्याचे सांगणारे महापालिकेतील पदाधिकारी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न होते. नवे आयुक्त आस्तिककुमार पांडेय मात्र हे सर्व चित्र हताशपणे पाहत होते. तब्बल दोन तास राज्यातील सत्तास्थापनेवरून कोण खरे, कोण खोटे? कोण कोणाला संस्कृती शिकवतो? यावरून दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांना खडेबोल सुनावले. 

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

कोणी केले वाटोळे? 
औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांना शिवसेना नगरसेवकांनी टार्गेट केले. त्र्यंबक तुपे यांनी तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. आज अपक्ष म्हणून सभागृहात बाजू मांडत आहात का, भाजपचे म्हणून? याचा खुलासा करा, अशी मागणी तुपे यांनी केली. सीताराम सुरे यांनी सातारा-देवळाईचे
काय झाले? अशी विचारणा शिंदे यांच्याकडे केली. त्यावर तत्कालीन पालकमंत्र्यांच्या आग्रहामुळे तुम्ही सातारा-देवळाईचे वाटोळे केले. माझी भूमिका विकासाची आहे आणि भाजप त्यासाठी सक्षम आहे, असा टोला शिंदे यांनी मारला. 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...
 
ठाकरेंना संबोधिले बिनखात्याचे मुख्यमंत्री 
भाजपचे राजू शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बिनखात्याचे मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. त्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला व शिंदे यांचा निषेध केला. भाजप पक्षाचा विजय असो म्हणत भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. तर शिवसेनेने जय भवानी, जय शिवाजी म्हणत भाजपला प्रत्युत्तर दिले. 

संभाजीनगरवरून आमने-सामने 
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या मागणीसाठी शिवसेना-भाजप नगरसेवक एकत्र येऊन आवाज उठवत होते; मात्र शुक्रवारी शिवसेना-भाजप आमने-सामने दिसून आले. राजू शिंदे यांनी आतातरी संभाजीनगर होणार का? असा प्रश्‍न केला. त्यावर शिवसेनेने पाच वर्षे तुमचा मुख्यमंत्री होता, तेव्हा संभाजीनगरची आठवण झाली नाही का? असा प्रश्‍न केला. या वादात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या नगरसेवकांना काय बोलावे हेही कळत नव्हचे. ते खुर्चीवर बसून गोंधळ पाहत होते. 

अरे बाप रे - माजलगावात द बर्निंग ट्रक, अचानक घेतला पेट  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics of Aurangabad Municipal Corporation