पदे घरातच, फक्त एकमेकांविरोधात आगपाखड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

‘एमआयएम’च्या साथीने हेमंत क्षीरसागर उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकपदांतही थोरामोठ्यांचेच नातेवाईक

‘एमआयएम’च्या साथीने हेमंत क्षीरसागर उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकपदांतही थोरामोठ्यांचेच नातेवाईक

बीड - एकीकडे सामान्यांना क्षीरसागरांच्या घरातील राजकीय द्वंद आणि एकमेकांविरोधातील आगपाखड दिसत असली, तरी पालिकेतील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही महत्त्वाची पदे त्यांच्याच घरात गेली. मंगळवारी (ता. १७) एमआयएमच्या स्वतंत्र गटाच्या साथीने हेमंत क्षीरसागर उपनगराध्यक्ष झाले. महत्त्वाच्या पदांसह स्वीकृत नगरसेवकांतही आणखी एक क्षीरसागर आहेतच. तर आघाडीच्या नेतृत्वानेही उपनगराध्यक्षपद स्वत:च्या घरात ठेवल्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदासाठी सामान्य कार्यकर्त्यांऐवजी थोरामोठ्यांचेच (राजेंद्र जगताप यांचे चिरंजीव आणि सय्यद सलीम यांचे चुलत बंधू) नातेवाईक निवडले.

पालिका निवडणुकीच्या निमित्ताने क्षीरसागरांच्या घरात काका - पुतण्या असे राजकीय युद्ध सुरू झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी आमने-सामने आलेल्या भावंडांपैकी रवींद्र क्षीरसागरांना धाकटे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागरांकडून पराभव पत्करावा लागला; पण दोन जास्त नगरसेवक निवडून आणून राष्ट्रवादीवर कडी करण्यात संदीप क्षीरसागरांना यश आले.

मागच्या आठवड्यात मंगळवारी (ता. दहा) पीठासीन अधिकारी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बोलावलेली विशेष सर्वसाधारण सभा त्यांच्याच प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने पुढे ढकलली होती. प्रकरण कोर्टाच्या पायरीपर्यंत गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिशीने मंगळवारी (ता.१७) सभा झाली. पीठासीन अधिकारी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपाध्यक्षपदासाठी आघाडीचे हेमंत क्षीरसागर व राष्ट्रवादीचे विनोद मुळूक यांची उमेदवारी होती. यामध्ये हेमंत क्षीरसागर यांना २७ (आघाडीचे २० व एमआयएमच्या स्वतंत्र गटाचे सात) तर विनोद मुळूक यांना १९ मते (राष्ट्रवादीचे १८ व नगराध्यक्षांचे एक) पडली. असे जुळले आकड्यांचे गणित पालिकेत आघाडीचे २०, राष्ट्रवादी १८, एमआयएम नऊ (पैकी सात जणांचा स्वतंत्र गट), शिवसेनेचे दोन व भाजप एक असे ५० नगरसेवक आहेत. 

नगराध्यक्षांनाही एक मतदानाचा अधिकार आहे. मंगळवारच्या बैठकीला परशुराम गुरखुदे गैरहजर होते, तर एमआयएमच्या एक नगरसेविका हजेरी लाऊन निघून गेल्या. हेमंत क्षीरसागर यांना आघाडीचे २० व एमआययएमच्या स्वतंत्र गटाचे सात असे २७ मतदान मिळाले. तर राष्ट्रवादीचे विनोद मुळूक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे एक, असे १९ मतदान पडले. शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक तटस्थ राहिले. शिवसेनेचे दोन व हजर असलेले एमआयमएचे अमर शेख तटस्थ राहिले. 

पाच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी
तौलानिक संख्याबळानुसार आघाडीकडून युवराज जगताप व शेख इक्‍बाल, राष्ट्रवादीकडून डॉ. योगेश क्षीरसागर, शुभम धूत तर एमआयएमच्या स्वतंत्र गटाकडून इद्रीस हाश्‍मी, अशी पाच जणांची निवड झाली. एमआयएमकडून शेख निझाम यांनी अर्ज दाखल केला होता. पण, हे पद आघाडीकडे गेले. दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली सोमवारीच इद्रीस हाश्‍मी यांची एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी शहराध्यक्षपदासह पक्षातून हाकलपट्टी केली होती. पण, त्यांना स्वतंत्र गटामुळे स्वीकृत नगरसेवक पदाची लॉटरी लागली. उमेदवारी अर्ज बाद झाल्याने रिंगणातून बाहेर गेलेले नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर यांचीही स्वीकृत नगरसेवकांच्या माध्यमातून पालिका सभागृहात एंट्री झाली. तर माजी नगराध्यक्ष स्मिता धूत व उद्योजक दिलीप धूत यांचे चिरंजीव शुभम धूत यांना काँग्रेसच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आल्याचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगीतले. राष्ट्रवादीकडून चिरंजीव युवराज जगताप यांना उमेदवारी न भेटल्याने नाराज माजी आमदार राजेंद्र जगताप यांनी आघाडीला साथ दिली होती. त्या बदल्यात युवराज जगताप यांची वर्णी लागली. तर इक्‍बाल शेख हे माजी आमदार सय्यद सलीम यांचे चुलत बंधू आहेत. 

सत्कार नाही; एकमेकांवर आगपाखड 
निवड झाल्यानंतर संकेतानुसार नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करतात. पण, उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हेमंत क्षीरसागरांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा सत्कार स्वीकारला नाही. निवडीनंतर डॉ. भारतभूषण क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर व संदीप क्षीरसागर यांनी एकमेकांवर आगपाखड केली. यानंतर आघाडीच्या समर्थकांनी विजयी जल्लोष केला. संदीप क्षीरसागर, सय्यद सलीम, हेमंत क्षीरसागर यांना खांद्यावर उचलून घेतले.

गुलालाची उधळण करून घोषणाबाजी केली. या वेळी अमर नाईकवाडे, फारुक पटेल, शाहेद पटेल, युवराज जगताप यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

शहराने दिलेला जनादेश झुगारून विविध आमिषांनी नगरसेवकांना फोडले. आपणही असा प्रकार सहज केला असता; पण चुकीचा पायंडा पडू नये म्हणून टाळले. विकासासाठी एकत्र येणाऱ्यांचे आपण स्वागत करू. मधल्या काळात यांचे नगरसेवक उजळ माथ्याने का फिरत नव्हते. कितीही खटाटोप केला असला, तरी सर्व अधिकार नगराध्यक्षांनाच आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळेच सभा पुढे ढकलली होती. 
- डॉ. भारतभूषण क्षीरसागर (नगराध्यक्ष, बीड)

आपल्या वडिलांविरुद्ध खोटे गुन्हे नोंद केल्याने नगराध्यक्षांकडून सत्कार स्वीकारला नाही. सत्तेत असलो तरी पीठासीन अधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका कायम राहील. कारभार पारदर्शक करून चांगला कौल देण्याच्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आघाडीला साथ देणाऱ्या नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन कामे केली जातील.  
- हेमंत क्षीरसागर (नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, बीड)

बहुमत नसल्यानेच नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर करीत हॉस्पिटलमध्ये जायचे नाटक करून वेळ वाढविला. न्यायालयाचे निर्देश येताच डिस्चार्ज कसा भेटला. सामान्यांचा आशीर्वाद आणि एमआयएमच्या गटाची साथ मिळाल्याने अखेर सत्याचा विजय झाला. वडिलांवर खोटे गुन्हे नोंद केले.   
- संदीप क्षीरसागर (सभापती, जिल्हा परिषद)

Web Title: politics in beed