परळी शहरात पाण्याचे राजकारण

प्रा. प्रवीण फुटके 
रविवार, 15 सप्टेंबर 2019

राजकारण आणि परळी हे समीकरण राज्याला नवे नाही; परंतु परळीकर पाणीटंचाईने त्रस्त असतानाही या मुद्द्याचेही परळीत राजकारण सुरू आहे.

परळी वैजनाथ (जि. बीड) - खडका बंधाऱ्यातून पाणी आणून परळीकरांची तहान भागविण्याऐवजी आता विंधनविहिरी घेण्याचा सपाटा शहरात सुरू आहे. कायमस्वरूपी उपायाऐवजी जखम चिघळत ठेवत त्यावर तात्पुरती मलमपट्टी असाच हा प्रकार सुरू आहे. 

परळी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच नगरपालिकेची पाणीयोजना यंदाच्या उन्हाळ्यात बंद पडली. त्यामुळे परळीकरांचे पाण्यासाठी बेहाल झाले. नगरपालिकेने 32 टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला; परंतु पाणीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी करीत टॅंकरचा आणि नगरपालिकेचा संबंध नाही. टॅंकरचे पैसे सरकार देत असून आपण सरकार असल्याचे त्या म्हणाल्या. त्याला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही उत्तर दिले. एकूणच परळीकरांची पाण्यासाठी वणवण सुरू असताना या मुद्द्याचेही राजकारण करायचे सोडले नाही. 

दरम्यान, आताही पावसाळ्याचे चार महिने लोटत आले. वार्षिक सरासरीच्या फक्त 50 टक्केच पाऊस पडला आहे. यामुळे तालुक्‍यातील सर्व लहान, मध्यम, मोठे प्रकल्प अद्याप कोरडेठाक आहेत. सध्याही शहराला टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. शहरातील नगरपालिकेचे जवळपास 700 बोअरवेल असून आतापर्यंत बंद असलेले काही बोअर काही दिवसांपासून सुरू झाले आहेत. मात्र, त्यामुळे परळीकरांना फारसा दिलासा भेटलेला नाही. सोनपेठ येथील खडका बंधाऱ्यातून परळी शहराला पाणी आणून कायमस्वरूपी टंचाईवर मात होऊ शकते; परंतु या मुद्द्याचेही राजकारण केले जात आहे. दरम्यान, आता परळीत मुंडे भावंडं वॉर्डांमध्ये मागेल त्या ठिकाणी विंधनविहिरी पाडून देत आहेत. 

उन्हाळ्यात 700 विहिरी कोरड्या 
सध्या पावसाळा असल्याने विंधनविहिरींना पाणी लागत असले तरी मागच्या उन्हाळ्यात 700 विहिरी कोरड्या पडल्याचाही इतिहास आहे. म्हणजे पुढच्या उन्हाळ्यात असाच प्रकार होणार. त्यामुळे टंचाईवर अशी तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी खडका बंधाऱ्यातून पाणी आणून कायम उपाय करावा, अशी परळीकरांची मागणी आहे; परंतु परळीकरांच्या मागणी आणि अडचणीपेक्षा इथे राजकीय मुद्दाच महत्त्वाचा ठरत आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The politics of water in the city of Parli