टॅंकरच्या पाण्यावर जोपासली डाळिंब बाग

प्रा. प्रवीण फुटके
गुरुवार, 10 जानेवारी 2019

परळी वैजनाथ - तालुक्‍यातील गाढेपिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गुरुलिंग सोनाप्पा फुटके यांनी बरडी रानावर दुष्काळी परिस्थितीतही टॅंकरने पाणीपुरवठा करून डाळिंबाची बाग जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

परळी वैजनाथ - तालुक्‍यातील गाढेपिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गुरुलिंग सोनाप्पा फुटके यांनी बरडी रानावर दुष्काळी परिस्थितीतही टॅंकरने पाणीपुरवठा करून डाळिंबाची बाग जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

मराठवाड्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे, यंदा काही भागांत रब्बीची पेरणीही झाली. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गाढेपिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गुरुलिंग सोनाप्पा फुटके यांच्या शेतातून माजलगाव कालव्याची उपचारी गेलेली आहे; पण या चारीला पाणी येत नाही, शेतात दुसरी कोणतीही पाण्याची व्यवस्था नाही. त्यांनी दोन विंधनविहिरी घेतल्या; पण जास्त पाणी लागले नाही. तीन वर्षांपूर्वी त्यांनी शेतात डाळिंबाची लागवड केली. यावर्षी या डाळिंबाला फळे लागली आहेत; पण मागील तीन ते चार महिन्यांपासून पाणी उपलब्ध नसल्याने मेहनतीने जगविलेली ही बाग वाळायलाही लागली; पण श्री. फुटके यांनी हार न मानता मागील तीन महिन्यांपासून शेतात या डाळिंबाच्या बागेसाठी टॅंकरने पाणी देण्यास सुरवात केली आहे. एक हजार रुपयांना एक टॅंकर पाणी मिळत आहे. एक दिवसाआड टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. दर महिन्याला साधारणपणे १५,००० रुपये या पाण्यावर खर्च होत आहेत. सतत एवढा खर्च करणे या अल्पभूधारक शेतकऱ्याला परवडणारे नाही; पण मेहनतीने वाढविलेली आणि फळे लगडलेली बाग डोळ्यांदेखत वाळून जात असल्याने त्यांनी टॅंकरचा आधार घेतला आहे. शासनाने या फळबागांसाठी लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी गुरुलिंग फुटके यांनी केली आहे.

Web Title: Pomegranate Agriculture Water Tanker Success Motivation