लिंबोणीत बहरली डाळिंबाची बाग 

लक्ष्मीकांत कुलकर्णी
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) : सुंदरराव काळे यांची प्रयोगशीलता, तीन एकरांत 17 लाखांचे उत्पन्न 

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) -  जिद्द, मेहनत, चिकाटी यासोबत अभ्यासपूर्ण नियोजन करून पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवडीचा नवीन प्रयोग करून लिंबोणी (ता. घनसावंगी) येथील शेतकरी तथा माजी सरपंच सुंदरराव काळे यांनी आपल्या शेतीची प्रगती साधली. दुष्काळाशी दोन हात करीत तीन एकर डाळिंबाची बाग जगवली. यातून 35 टनांपेक्षा जास्त डाळिंबाचे उत्पादन घेऊन 17 लाखांचे उत्पन्न काढले. नाशिकच्या व्यापाऱ्याने शेतावर येऊन डाळिंब खरेदी करून त्याचे पॅकिंग करून थेट उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या बाजारात विक्रीसाठी नेले हे विशेष. 

सुंदरराव काळे यांनी लिंबोणीचे सरपंच झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आधुनिक शेती शिवार फेरी, कृषी प्रदर्शन, ऍग्रोवनची सरपंच परिषद यातून प्रेरणा घेत मिश्र शेती करण्याचा निर्णय घेतला. श्री. काळे यांना तीर्थपुरी-कुंभार पिंपळगाव रस्त्यालगत 36 एकर शेती आहे. सात विहिरी व डाव्या कालव्यावरून दोन पाइपलाइन केलेल्या आहेत. शेतात तीन एकर पेरू, साडेचार एकर सीताफळ, साडेतीन एकर मोसंबी, अडीच एकर कांदा, तीन एकर ऊस यांसह मका, सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिके घेतली जातात. पूर्ण शेतीसाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा उपयोग करून पाण्याचे नियोजन करून थेंब-थेंब पाण्याचा काटकसरीने उपयोग करतात. ते व त्यांचे मोठे बंधू कल्याणराव काळे दोघेही शेतात मेहनत करतात. सहा वर्षांपूर्वी त्यांनी तीन एकरांवर 1100 डाळिंबाची झाडे लावली. सतत दुष्काळाचे चटके सहन करीत बाग जगवली. जनावरांचे गावरान शेणखत, कोंबडी खत, लिंबोळी पेंड यांचा वापर केला.

यावर्षी बाग चांगलीच बहरली, एका झाडाला 25 ते 30 किलोंपर्यंत फळे लागली, एका फळाचे वजन दीडशे ते चारशे ग्रॅमपर्यंत भरले. त्यामुळे नाशिक येथील डाळिंब व्यापाऱ्यांनी त्यांची बाग बघून थेट शेतातून डाळिंब खरेदी केले व गोरखपूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले. व्यापाऱ्यांनी जागेवर 55 रुपये किलोप्रमाणे डाळिंब खरेदी केले. यातून त्यांना तब्बल 17 लाखांचे उत्पन्न मिळाले. यासाठी त्यांचा अडीच लाखांचा खर्च झाला. डाळिंबाच्या बागेला वन्यप्राणी व रानडुकरांपासून वाचविण्यासाठी चार्जिंगचे चार फवाऱ्यांचा उपयोग करून बागेत लायटिंग, एलईडीचे फोकस, टेपरेकॉर्डर लावत पहारा दिला. 

सतत दुष्काळाचा फटका, पारंपरिक शेतीतील उत्पन्नाच्या मर्यादा यातून बोध घेत पारंपरिक शेतीबरोबरच फळबागांची मिश्र शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कृषी प्रदर्शन, ऍग्रोवन सरपंच परिषद, शिवार फेरीतून मार्गदर्शन घेतले. परिणामी शेतातील मेहनत फळाला आली. 
सुंदरराव काळे, शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate farm