डाळिंब बागेने दिला शेतकऱ्याला आधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

औरंगाबाद - एकीकडे शेतकरी नापिकीने आत्महत्येसारखा पर्याय निवडत असताना काही शेतकरी जिद्द, नवीन प्रयोग राबवून प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. कष्टासोबतच प्रशिक्षणाची जोड देऊन शेती केली तर ती यशस्वी होते, हे खिर्डी (ता. खुलताबाद) येथील केशव धोत्रे यांनी दाखवून दिले आहे. धोत्रे यांनी एका एकरात तब्बल दहा टन डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे एक डाळिंब अर्धा किलोचे भरले आहे.

डोंगरपायथ्याशी व पाण्याचा फारसा स्रोत नसलेल्या खिर्डी येथील केशव किसन धोत्रे यांनी चार वर्षांपूर्वी एका एकरात डाळिंबाची बाग लावली. जवळपास चारशे झाडे ‘ठिबक’वर जगविली. केशव यांनी मधुमक्षिकापालन प्रशिक्षण घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बी. बी. वायकर यांनी शेतात भेट देऊन मधपेटी हाताळण्याची; तसेच मधमाशीच्या जीवनशैलीची माहिती समजावून सांगितली. डाळिंब शेतात परागीभवनाने उत्पादनात वाढ झाली. औषध फवारणीचा खर्चही बराच वाचला. रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खतांचा डोस दिला. तीन वर्षांपासून डाळिंबाची फळगळती होत होती. मात्र, यंदा मधमाशीमुळे परागीभवन झाल्याने फळांचा आकार एकसारखा झाला. मधमाशी जगविण्यासाठी शेतात झेंडूची फुले, मोहरी लावली. त्यामुळे मधमाशा दुसरीकडे गेल्या नाहीत.

सध्या डाळिंबाची तोड सुरू आहे. डाळिंबाला पंचावन्न रुपये किलो भाव मिळाला. नाशिक येथील व्यापाऱ्याने साडेपाच हजार रुपये क्विंटलप्रमाणे जागेवरून खरेदी केली आहे. माजी सैनिक किसन धोत्रे व मुलगा केशव हे शेतात वेगवेगळे प्रयोग राबवीत राहतात. 

दरम्यान, धोत्रे यांच्या शेतास डॉ. वायकर, किरणकुमार धोत्रे, प्रल्हाद घाटगे-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील वर्षी डाळिंब निर्यात करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एका एकरात चारशे झाडे असून, त्यात दहा टन म्हणजे शंभर क्विंटल माल निघाला. सत्तर टक्के माल हा तीनशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत असून, तीस टक्के माल पाचशे ग्रॅम भरला आहे. शेतात मधपेटी ठेवल्याने परागीभवन झाले. शेतात प्रयोग करीत राहिल्यास हमीचे उत्पन्न मिळू शकते.
- केशव धोत्रे, शेतकरी, खिर्डी, ता. खुलताबाद

Web Title: pomegranate farmer support agriculture