संवेदना थिजल्या; भावना बोथट झाल्या

औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर भुकेने व्याकूळ झालेली  हीच ती असहाय व्यक्ती.
औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर भुकेने व्याकूळ झालेली हीच ती असहाय व्यक्ती.

औरंगाबाद - उष्णतेमुळे अंगाची होणारी लाही लाही. पाणी प्यायचे तर उठून धड चार पावले चालताही येत नाही. अशातच पाच-सहा दिवसांपासून पोटात अन्नाचा कणही नाही, अशा अवस्थेत शहरातील मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर एक असहाय ज्येष्ठ नागरिक येणाऱ्या-जाणाऱ्या गर्दीकडे आशाळभूत नजरेने पाहत आहे. काही सुज्ञ नागरिकांनी याची माहिती १०८ रुग्णवाहिका आणि पोलिसांना देऊन साधी दखलही घेतली गेली नाही. त्यामुळे संवेदना थिजल्या आहेत का, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.  

देशातील कुठल्याही रेल्वेस्थानकावर बेवारस व्यक्ती, भीक मागून पोटाची भूक भागवणाऱ्यांची संख्या कमी नसते. रेल्वेगाड्या आणि रेल्वेस्थानकांमध्ये पोटासाठी वणवण भटकंती करणारे महिला, पुरुष आणि मुलांची वाढती संख्या ही देशाची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. वणवण भटकंती करूनही पोटाची भूक भागत नसल्याचे वास्तव विचार करण्यास भाग पाडते आहे. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी एक व्यक्ती तिकीट खिडकीच्या कोपऱ्यात निपचित पडून आहे. अन्नपाण्यावाचून त्यांच्या अंगात त्राण उरलेला नाही. प्रचंड लाही लाही करणाऱ्या उन्हाच्या झळा आणि पोटात अन्नाचा कण नसल्याने झालेली व्याकूळता ही त्याला मृत्यूच्या दिशेने घेऊन जात आहे. त्याला उपचारांची गरज आहे. प्रशासकीय यंत्रणा लक्ष द्यायला तयार नाही. 

१०८ रुग्णवाहिकेचा हेकेखोरपणा 
या व्यक्तीची ही अवस्था पाहून तिकीट बुकिंग कर्मचारी गोविंद पुंडगे हे १०८ रुग्णवाहिकेला तीन दिवसांपासून रोज फोन करीत आहेत; मात्र तुम्हाला रुग्णालयात सोबत यावे लागेल, असा हेका रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यामुळेच पुंडगे यांनी रविवारी (ता. २८) सकाळी रेल्वे सुरक्षा बलाला रीतसर मेमो देऊन माहिती दिली; पण सायंकाळी सहापर्यंत ही व्यक्ती त्याच ठिकाणी पडून होती. दुसरीकडे काही रिक्षाचालकांनी मुकुंदवाडी पोलिसांना कळवले; मात्र पोलिसांनीही साधी दखल घेतली नसल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे सरकारी पातळीवर गोरगरिबांच्या पुनर्वसनाच्या कितीही बाता केल्या, तरीही त्या पोकळ आहेत. कागदांवर आकड्यांचा खेळ करणाऱ्या सरकारला निराधारांच्या प्रश्‍नांवर काम करण्याची सुबुद्धी कधी येईल, हा खरा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com