टपाल विभागाची पावले आता बॅंकिंगकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

ग्राहकांना बॅंकेप्रमाणे सर्वच प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न
शेखलाल शेख

ग्राहकांना बॅंकेप्रमाणे सर्वच प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न
शेखलाल शेख
औरंगाबाद - सर्वांच्या जिव्हाळ्याचे असलेले, आधुनिक युगातही पारंपरिकतेत रमलेले टपाल खाते आता स्पर्धेच्या काळात अस्तित्व टिकविण्यासाठी कूस बदलत आहे. कामाच्या स्वरूपात अनेक बदल होत आहेत. या खात्याने संगणकाची कास धरली आहे. "आयटी मॉडरेशन प्रोजेक्‍ट'च्या माध्यमातून देशातील 1 लाख 54 हजार टपाल कार्यालये संगणकीकरणाशी जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

आतापर्यंत 1 लाख 29 हजार 346 कार्यालये संगणकीकृत झाली आहेत. छोट्या रकमेपासून बचतीची सवय लावणाऱ्या या खात्याची वाटचाल आता बॅंकिंगच्या दिशेने होत आहे. राष्ट्रीयीकृत, सहकारी बॅंकांना टक्कर देण्यासाठी टपाल विभागाने 2005 पासून तयारी सुरू केलेली आहे, त्याचे दृश्‍य परिणाम आता दिसू लागले आहेत. सध्या पेमेंट बॅंकिगची परवानगी मिळाली असून टप्प्याटप्प्याने देशात 650 शाखा सुरू केल्या जात आहेत. त्यांतील महाराष्ट्रात तीन शाखा असून, त्यांपैकी एक औरंगाबादेत असेल.

मनीऑर्डर, "रिकरिंग डिपॉझिट' व तत्सम बचतीच्या योजना राबविणाऱ्या टपाल विभागात बॅंकिंगचा अंश होताच; पण त्यापुढे गाडी जात नव्हती. आता मात्र अनेक बदल होताना दिसत आहेत. आता टपाल कार्यालयांची रचनासुद्धा बॅंकेप्रमाणे करण्यात आली आहे.

बॅंकांप्रमाणे एटीएम, चेकबुकसह सर्व सुविधा द्यायला सुरवात झाली आहे. महाराष्ट्रात 12 हजार 859 टपाल कार्यालये असून, यामध्ये 87 लाख 22 हजार 649 बचत खाती आहेत. या बचत खात्यांमध्ये 3997.99 कोटी एवढी मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे या विभागाने बॅंकेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विशेष म्हणजे टपालाच्या सर्वच बचत योजनांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. औरंगाबादेत "इंडिया पोस्ट पेमेंट बॅंके'साठी जुना बाजार येथील मुख्य कार्यालयात तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

बॅंकिंग सुविधेसाठी...
भारतीय टपाल खात्याने बॅंकेप्रमाणे सुविधा देण्यास सुरवात केली आहे. टपाल खात्याची देशभरात 22 मंडळे असून 1 लाख 54 हजार 990 कार्यालये आहेत. यांपैकी 1 लाख 38 हजार 955 ग्रामीण भागात आहेत. 15 हजार 955 टपाल (10.30 टक्के) कार्यालये शहरांत आहेत. सर्वाधिक कार्यालये ग्रामीण भागात असल्याने पोस्टाच्या बॅंकिंग सेवेचा सर्वाधिक फायदा याच भागाला होईल. महाराष्ट्रात 12 हजार 859 पेक्षा जास्त टपाल कार्यालये असून बहुतांश संगणकीकृत आहेत. ती कोअर बॅंकेशी जोडण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना एटीएमचा वापर शक्‍य होत आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या निकषानुसार जेथे बॅंका नाहीत, अशा ग्रामीण भागात नवीन बॅंकेला 25 टक्के शाखा उघडणे बंधनकारक आहे.

टपालाचे नेटवर्क आधीच ग्रामीण भागात आहे. सध्या पेमेंट बॅंकिंगचा परवाना मिळाला असला, तरी रिझर्व्ह बॅंकेकडून सर्वसाधारण बॅंकांप्रमाणे परवाना मिळाल्यावर या खात्याच्या सर्वाधिक शाखा ग्रामीण भागात असतील. तसे प्रयत्न सुरू आहेत.

कोट्यवधींची बचत खाती
टपाल खात्यात 16 कोटी 30 लाख 30 हजारांपेक्षा जास्त लघुबचत खाती आहेत. यामध्ये कोट्यवधींची बचत जमा आहे. एकूण खातेदारांची संख्या इतर बॅंकांच्या तुलनेत जास्त आहे. टपाल खाते हे देशात सर्वाधिक नेटवर्क, सेवा देणारे आहे. त्यामुळेच भविष्यात बॅंक सुरू करता येईल, होईल या दृष्टीने टपाल विभागाची पावले पडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सध्या टपाल खात्याचे मुख्य, उपकार्यालये बॅंकेप्रमाणे बनविण्यात आली आहेत. बॅंकिंग सुविधा देता यावी यासाठी कोअर बॅंकिंग केली जात आहे. सध्या केवळ बॅंकिंगसारख्या सुविधा देणारे टपाल खाते शंभर टक्के बॅंकिंग परवाना मिळाल्यास आगामी काळात ही सेवा देण्यासही सज्ज होत आहे.

अनेक बॅंकिंग सुविधा
सध्या टपाल विभागातून बॅंकिंगप्रमाणे अनेक सुविधा देण्यात येत आहेत. यामध्ये सेव्हिंग बॅंक, एटीएम, रिकरिंग डिपॉझिट, मंथली इन्कम स्कीम, सिनिअर सिटीझन, सुकन्या समृद्धी, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पीएफ, किसान विकासपत्र, बचत विमा, इलेक्‍ट्रॉनिक मनिऑर्डर, विदेशी चलन सेवा आदी बॅंकांप्रमाणे विविध सुविधा देण्यात येत आहेत.

मराठवाडा, खान्देशात तयारी पूर्ण
मराठवाड्यातील आठ तर खान्देशातील चार अशा बारा जिल्ह्यांत टपाल बॅंकेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात 11 हेड पोस्ट ऑफिस, डिपार्टमेंटल पोस्ट ऑफिस 384 तर ब्रॉन्च पोस्ट कार्यालये 2 हजार 817 आहेत. या कार्यालयात 9 लाख बचत उघडण्यात आली तर आतापर्यंत 65 लाख 74 हजार बचत खाती आहेत. औरंगाबाद विभागाने जालना, भोकरदन, भुसावळ, बीड, जळगाव, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नाशिक अशा 13 ठिकाणी पोस्टाचे एटीएम सुरू केले आहे. तर 25 ग्राहकांना एटीएम कार्डांचे वाटप झाले आहे.

दृष्टिक्षेपात...
- देशात 1 लाख 54 हजार 190 टपाल कार्यालये
- ग्रामीण भागात 1 लाख 38 हजार 955 कार्यालये
- शहरी भागात 15 हजार 955 कार्यालये
- महाराष्ट्रात 12 हजार 859 कार्यालये
- देशात ग्रामीण डाक सेवा पोस्ट कार्यालये 1 लाख 29 हजार 346
- ग्रामीण डाक सेवकांची संख्या 2 लाख 55 हजार 29
- संगणकीकृत कार्यालये 1 लाख 29 हजार 346

Web Title: post department go to banking