पर्यटन राजधानीत खड्डेच खड्डे चोहीकडे

औरंगाबाद शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था.
औरंगाबाद शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था.

औरंगाबाद - केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या जालना रस्ता आणि व्हीआयपी रोडला डांबरी मुलामा मिळाला. मात्र, या दोन रस्त्यांना जोडणाऱ्या सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट या रस्त्यावर वाहन चालवणे वेदनादायी झाले आहे. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणाच निकामी झाल्याने रस्त्यावर पाणी साचून सुमारे वीस मीटर रुंद रस्त्यावर सध्या "खड्डेच खड्डे चोहीकडे' असे चित्र आहे. 

शहराला हर्सूल, सावंगी, भगतसिंगनगर, मयूरपार्क, जटवाडा आदी भागांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हर्सूल टी पॉइंट ते सिडको बसस्थानकादरम्यानच्या साडेसहा किलोमीटरच्या दुतर्फा वाटेला खड्ड्यांनी गराडा घातल्याने येथून वाहनचालकांना कठीण परीक्षाच द्यावी लागत आहे. साडेसहा किलोमीटरच्या वाटेवर सुमारे साडेसहाशे खड्डे असलेल्या या रस्त्यावरील पडणाऱ्या पाण्याचा उतार अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने काढण्यात आला आहे. मात्र, पाणी फुटपाथलगत आल्यावर त्याचा निचरा होण्यासाठी तयार करणाऱ्या यंत्रणांचा तोबरा मातीने भरलेला असल्याने पाणी वाटेवर आडून राहत डांबराला कमकुवत करण्याचे काम करीत आहे. 
 
बंद पडलेली निचरा यंत्रणा 
या रस्त्याची भौगोलिक परिस्थिती पाहता, रस्त्यावर पडणारे पाणी निघून जाण्यासाठी रस्त्याला उतार देण्यात आला. मात्र त्यातून येणारे पाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हरितपट्ट्यात सोडण्यासाठी निचरा यंत्रणा तयार करण्यात आली. पंधरा फुटांच्या अंतरावर असलेल्या या गटारींमध्ये जमा होणारे पाणी पाइपद्वारे हरित पट्ट्याकडे रवाना होणे अपेक्षित असताना तसे गेल्या अनेक वर्षांत झालेले नाही. ही मातीने तुंबलेली यंत्रणा कधीच मोकळी न केल्याने रस्त्यांच्या कडांवर राहणारे पाणी या कडा खात आहे. 
 
'एसबीओए'समोर साचतो तलाव 
 एसबीओए शाळेच्या समोर असलेला एक पेट्रोलपंप आणि रस्त्यामधील असलेला सखल भाग या रस्त्यावर तलाव तयार करतो. हा तलाव मात्र अनेक अपघातांना कारण ठरतो आहे. या तलावाच्या पाण्याचे नेमके काय करायचे, यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचार करण्यासाठी वेळच मिळालेला नाही. असे तलाव जागोजागी कमी-अधिक प्रमाणात साचत असल्याने या रस्त्यावरील डांबरी थर मोठ्या प्रमाणात खराब व्हायला कारणीभूत ठरले आहेत. 
 

डांबरीकरण होईल; पण रस्त्याचे आयुष्य? 
सध्या तात्पुरता दिलासा देण्यासाठी या रस्त्यावरील खड्डे भरण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया करून हे काम होण्यास मात्र पंधरवडा लागण्याची चिन्हे आहेत. हे काम होता होता पावसाळा संपल्यावर या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या निविदा निघण्याची चिन्हे आहेत. मात्र या निविदेमध्ये आचारसंहितेचा खोडा आल्यास दिवाळीपर्यंत या रस्त्याचे दिवाळे निघेल आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांची हाडे मोडतील. डांबरीकरण करण्यात आले तरी रस्त्यावरील पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा बंद असेल तर या नव्याने केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे आयुर्मान किती, हा सवाल कायमच राहणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com