सिडको बसस्थानकाचा रस्ता हरवला खड्ड्यांत - Video

अनिल जमधडे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

  • बसस्थानकासमोरचे डिव्हायडर बंद
  • सर्वाधिक फटका एसटी बसगाड्यांना
  • वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढला 

औरंगाबाद  : सिडको बसस्थानकासमोरील अंतर्गत रस्ता खड्ड्यांमध्ये हरवला आहे. त्यातच वाहतूक पोलिसांनी प्रवेशद्वारासमोरचा रस्ता बंद केला. परिणामी खड्डेमय झालेल्या रस्त्यावर सर्वाधिक त्रास एसटीला सहन करावा लागत आहे. शिवशाही तर आदळून खिळखिळ्या होत आहेत.

सिडको बसस्थानकासमोर असलेल्या जळगाव रस्त्याच्या समांतर अंतर्गत रस्ता आहे. या रस्त्यावरूनच एसटीला बसस्थानकापर्यंतचा प्रवास करावा लागतो. सिडको चौकातून पिरॅमिड चौकापर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्ड्यांमध्ये हरवला आहे. येथे रस्ता होता, अशी एकही खूण शिल्लक राहिलेली नाही. तरीही महापालिकेला जाग येत नाही, ही गंभीर बाब आहे. 

Aurangabad News
सिडको बसस्थानकासोर असे जिवघेणे खड्डे पडले आहेत

अपघाताची शक्‍यता 

सिडको बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर जळगाव रस्त्यावर रिक्षाचालकांमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. दिवसभरात अनेकवेळा या चौकात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी बसस्थानकासमोरचा रस्ता बंद केला. त्यामुळे एसटीला पुढे अर्धा किलोमीटर जाऊन सारस्वत बॅंकेच्या समोरून वळण घेऊन पुन्हा बसस्थानकाच्या दिशेने परत यावे लागते.

हेही वाचा - आयुक्तांविना कशी चालते महापालिका

मुळात एसटी बसला वळण घेताना रस्ता छोटा असल्याने चालकाला प्रचंड कसरत करावी लागत आहे. त्यातच अंतर्गत रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे यामुळे तर एसटी बस खालच्या बाजूने आदळण्याचे प्रकार वाढल्याने एसटीचे नुकसान होत आहे. याशिवाय प्रचंड मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्‍यता अधिक वाढली आहे. 

Aurangabad News
सिडको बसस्थानकासमोर वाहतुक पोलिसांनी डिव्हायडर बंद केल्याने एसटीला प्रचंड त्रास होत आहे.

वादावादीचे प्रसंग 

शहराबाहेरून आलेली एसटी बस सिडको बसस्थानकामध्ये जाताना सारस्वत बॅंकेच्या जवळ वळण घेताना असलेल्या दारूविक्रीच्या दुकानासमोर बसला अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. दारूच्या दुकानासमोर मद्यपींची गर्दी, अस्ताव्यस्त लावलेली वाहने, त्यातच रस्ता छोटा असल्याने बसचालकाला वळण घेताना अडथळे येतात. परिणामी रस्त्यावर बेशिस्त पार्किंग केलेली वाहने आणि घोळक्‍यांनी थांबलेले लोक एसटीच्या चालकाला शिवीगाळ करीत असल्याचे प्रसंग येत आहेत. 

दुभाजक खुले करा 

सिडको बसस्थानकासमोर जळगाव रस्त्यावर वाहतूक कोंडीचे कारण देऊन शहर वाहतूक पोलिसांनी डिव्हायडर बंद केले आहे. त्यामुळे एसटीला दररोज अर्धा किलोमीटरचा फेरा घेऊन बसस्थानकात यावे लागत आहे. त्यामुळे डिझेलचा खर्च वाढला असल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना चारवेळा पत्र पाठवून डिव्हायडर खुले करण्याची विनंती केली; मात्र वाहतूक पोलिस ऐकण्यास तयार नाहीत. वाहतूक पोलिस ऐकत नाहीत, महापालिका रस्त्याचे काम करीत नाही, त्यामुळे एसटीला प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

काय आहे नुकसान? 

सिडको बसस्थानकासमोर डिव्हायडर बंद केल्याने अर्धा किलोमीटरचा फेरा घेऊन अंतर्गत रस्त्यावर बसला यावे लागते. अंतर्गत रस्त्यावरील मूळ रस्ता शिल्लक राहिला नाही. तब्बल दोन ते अडीच फुटांपर्यंतचे खड्डे पडल्याने एसटीच्या डिझेलच्या खर्चात वाढ झाली. याशिवाय स्प्रिंग तुटणे, एसटीचा पत्रा खालच्या बाजूने घासणे, प्रवाशांना इजा होणे असे प्रकार वाढले आहेत. 

वाहतूक पोलिसांनी बसस्थानकासमोरील डिव्हायडर बंद केल्यामुळे एसटीला अंतर्गत रस्त्याच्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. चालकांना प्रचंड त्रास होत असून, एसटीचे नुकसानही होत आहे. त्यामुळेच डिव्हायडर काढण्याचे वाहतूक पोलिसांना चारवेळा पत्र दिले आहे.
- अमोल भुसारी, आगार व्यवस्थापक, सिडको बसस्थानक 

हेही वाचा - बायको छळते? इथे मिळेल आधार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Potholes on Aurangabad Sreets - Video