शेतमजुराचा जिद्दी मुलगा झाला फौजदार

कैलास चव्हाण
शुक्रवार, 12 मे 2017

प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर गावाजवळ असलेल्या पाचलेगाव येथे रोज सहा किलोमीटर पायी चालत ये-जा करून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कंपांउडरची नोकरी करून बारावी पूर्ण केली. त्यानंतर तो हिंगोली येथे राज्य राखीव पोलिस दलात (SRP) भरती झाला. त्यानंतर त्याने हे स्वप्न पूर्ण केले आहे.

जिंतूर : हालाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेणेही दुरापास्त झालेले असताना एका गरीब मजुराच्या होतकरू मुलाने स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले असून, तो फौजदार बनला आहे. उराशी ध्येय बाळगून केलेल्या कठोर परिश्रमाला निश्चितच यश मिळते हे त्याने या यशातून दाखवून दिले आहे. अशोक दिगंबर येवले असे या जिद्दी तरुणाचे नाव आहे.

अशोकचा जन्म अत्यंत गरीब शेतमजुराच्या कुटुंबात जन्म झाला. जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे या लहानशा खेड्यातील अशोकचे वडील दुसऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. अशोक यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर गावाजवळ असलेल्या पाचलेगाव येथे रोज सहा किलोमीटर पायी चालत ये - जा करून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणाची जवळपास सोय नसल्याने शिवाय घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने मुलाने मोलमजूरी करून प्रपंचाला हातभार लावावा असे अशोकच्या वडीलास वाटत होते. परंतु अशोकला शिकण्याची इच्छा असल्याने त्याने जिंतूर येथे डॉ. वाघमारे यांच्या हॉस्पिटलमध्ये कंपांउडरची नोकरी करून बारावी पूर्ण केली. त्यानंतर तो हिंगोली येथे एस.आर.पी.मध्ये भरती झाला. त्यानंतरही जिद्द कायम राखत त्यांनी फौजदार बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.

यश सैनिकांना समर्पित
अधिकारी बनण्याचे स्वप्न झोप घेऊ देत नसल्याने अहोरात्र मेहनत करून तो एमपीएस्सीच्या तयारीला लागला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत त्याने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. या यशाचे श्रेय आई, वडील, गुरुजन, मित्र यांच्यासह सुकमा जिल्ह्यातील नक्षली हल्यात शहीद जवानांना आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना समर्पित केले.

Web Title: poverty ridden peasant's son becomes police inspector