दोन झाडे लावली तरच पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांचे अनुदान हवे असेल तर नव्याने बांधलेल्या घरासमोर किमान दोन झाडे लावणे बंधनकारक असेल, अशी अट आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी (ता. चार) लाभार्थींना घातली आहे. 

औरंगाबाद - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांचे अनुदान हवे असेल तर नव्याने बांधलेल्या घरासमोर किमान दोन झाडे लावणे बंधनकारक असेल, अशी अट आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी (ता. चार) लाभार्थींना घातली आहे. 

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेकडे 80 हजार जणांनी घरासाठी अर्ज केले होते. त्यातील पाच हजार 500 लाभार्थींची निवड करून डीपीआर महापालिकेने शासनाकडे पाठविला; मात्र शासनाने फक्त 731 लाभार्थींची निवड केली आहे. त्यानुसार 731 जणांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी लाभार्थींचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे मेळावा घेतला. यावेळी योजनेची माहिती देण्यात आली.

लाभार्थींना 329 चौरस फुटांमध्ये घरकुल बांधणे बंधनकारक आहे. त्यासाठीची कागदपत्रे स्थापत्य अभियंता यांच्यामार्फत जमा करून बांधकाम परवानगी शुल्क, विकास शुल्क व जमीन शुल्क भरून बांधकाम परवानगी घेणे आवश्‍यक आहे. प्रत्येक लाभार्थींना घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे. अर्धवट बांधकाम झाल्यास घरकुलास मिळणारे 2 लाख 50 हजार रुपयांचे सरकारी अनुदान मिळणार नाही. प्रत्येक लाभार्थींनी आपल्या घरासमोर किमान दोन झाडे लावणे यात बंधनकारक असेल.

सर्व बाबींची पूर्तता झाल्यावरच लाभार्थींना सरकारच्या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. लाभार्थींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण आयुक्तांनी केले. यावेळी 250 लाभार्थी उपस्थित होते. तसेच संतोष कवडे, सहायक आयुक्त पल्लवी घाडगे, बीओटी कक्षप्रमुख खमर शेख, पंतप्रधान आवास योजना व रमाई योजनेचे उपअभियंता रामदासी, प्रकल्प सल्लागार आर्क असोसिएटचे श्रॉफ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.  

Web Title: Pradhan Mantri Awas Yojana Grant of only after planting two trees