प्रकाश आंबेडकरांनी भाजपसोबत यावे - रामदास आठवले

प्रकाश आंबेडकरांनी भाजपसोबत यावे - रामदास आठवले

औरंगाबाद - ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा भाजप महायुतीलाच फायदा होणार आहे. त्यामुळे स्वतंत्र निवडणुका लढवून अप्रत्यक्षपणे भाजपला लाभ मिळवून देण्यापेक्षा त्यांनी भाजपमध्ये यावे, त्यांना मंत्रिपद मिळेल. मग प्रकाश आंबेडकर आणि मी मिळून समाजाला पुढे नेण्याचे काम करू, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ‘ऑफर’ दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन व जाहीर सभा घेण्यासाठी रामदास आठवले औरंगाबादेत आले होते. सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडी ‘वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी’ आघाडी आहे. या आघाडीमुळे भाजप आणि महायुतीलाच फायदा होईल. तेव्हा केवळ मते खाऊन भाजपला अप्रत्यक्ष फायदा पोचविण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी भाजपसोबतच यावे.

केंद्र सरकारने जाहीर केलेले दहा टक्के सवर्णांचे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे वक्तव्य शरद पवारांनी नुकतेच केले होते. याचा संदर्भ देत हे आरक्षण टिकविण्याची जबाबदारी आता सरकारची आणि आमची असल्याचे सांगत मराठा आणि सवर्णांच्या आरक्षणासाठी आपण वीस वर्षांपासून भूमिका मांडत होतो, असा दावा आठवले यांनी केला. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात आणखी दहा टक्‍क्‍यांनी वाढ करावी, या मागणीसाठी आपण पंतप्रधानांना भेटणार असून भटक्‍या विमुक्तांना नोकरी, शिक्षणाप्रमाणेच राजकारणातही आरक्षण मिळावे, असे आपले प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, वंचित आघाडीला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ता. १० फेब्रुवारीला जबिंदा लॉनवर मेळावा घेत पक्षाची ताकद दाखवू, असेही आठवलेंनी सांगितले. पत्रकार परिषदेस बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, अरविंद अवसरमोल, संजय ठोकळ, बाळकृष्ण इंगळे, पुंजाराम जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com