प्रतीकच्या अवयवदानाने चौघांच्या जीवनात चैतन्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

औरंगाबाद - जेमतेम पंधरा वर्षे वय असतानाच अपघातामुळे जगाचा निरोप घ्यावा लागला; पण जाताना त्याने चौघांच्या आयुष्याला नवसंजीवनी दिली. प्रतीक वाहूळ (रा. मिसारवाडी) असे या मुलाचे नाव.

औरंगाबाद - जेमतेम पंधरा वर्षे वय असतानाच अपघातामुळे जगाचा निरोप घ्यावा लागला; पण जाताना त्याने चौघांच्या आयुष्याला नवसंजीवनी दिली. प्रतीक वाहूळ (रा. मिसारवाडी) असे या मुलाचे नाव.

ब्रेनडेड झाल्यानंतर त्याच्या अवयवदानाची प्रक्रिया एमजीएम रुग्णालयात शुक्रवारी (ता. 21) पार पडली. त्यातून दोघांना किडनी, एकाला हृदय व एकाला यकृत, तर घाटी रुग्णालयात नेत्रदान करण्यात आले. यामुळे तो अवयवदानाचा प्रतीक ठरला. त्याच्या कुटुंबीयांच्या सकारात्मकतेमुळे चौघांची जीवनज्योत प्रज्वलित झाली.

एमजीएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी अवयवदानाबाबत माहिती दिली. इयत्ता आठवीतील प्रतीक 19 जूनला सायंकाळी चारच्या सुमारास मित्रांसह दुचाकीवरून जात होता. दूध डेअरी सिग्नलजवळ दुचाकीला अपघात झाल्याने प्रतीकच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली होती. एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याला दाखल करण्यात आले. 21 जूनला रात्री आठ वाजता डॉक्‍टरांच्या समितीने त्याला ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर पार पडलेल्या अवयवदानाच्या प्रक्रियेत डॉ. राहुल सक्‍सेना (नागपूर), डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. राहुल चौधरी, डॉ. संदीप जावळे, डॉ. नारायण सानप यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

...अशी झाली प्रक्रिया
- गुरुवारी प्रतीकच्या कुटुंबीयांकडून अवयवदानासाठी पुढाकार
- अवयवदानासाठी विविध चाचण्या
- शुक्रवारी दुपारी अडीचला औरंगाबाद येथून चार्टर विमानाने हृदय मुंबईला
- याच चार्टर विमानासोबतच यकृत मुंबईमार्गे नागपूरला
- औरंगाबादमधील एमजीएम व बजाज रुग्णालयात दोन्ही किडन्या
- ग्रीन कॉरिडॉर तयार करून अवयवांची वाहतूक

अपघातानंतर प्रतीकच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. यात राज्य शासन व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठी मदत केली, त्यामुळे सर्व प्रक्रिया त्वरित व विनाअडथळा पार पडल्या.
- डॉ. सुधीर कुलकर्णी, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ, एमजीएम रुग्णालय व झेडटीसीसीचे औरंगाबादचे अध्यक्ष

Web Title: pratik vahul body organs donate 4 people life saving