गर्भवती महिला मधुमेहाच्या उंबरठ्यावर!

मुकेश झणझणे
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

दिवसेंदिवस मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. यापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. डॉक्‍टरांकडे वेळोवेळी रक्तदाब, रक्तशर्करा यांची तपासणी करावी जेणेकरून संभाव्य आजार टाळता येऊ शकतो. 
- डॉ. प्रशांत कुलकर्णी, मधुमेह तज्ज्ञ

१५ ते २० टक्‍क्‍यांपर्यंत झाली वाढ, व्यायामाचा अभाव, बदलती जीवनशैली कारणीभूत

बीड - गर्भवती मातेला मधुमेह होण्याचे प्रमाण पूर्वी आठ टक्के होते. अलीकडे त्यात १५ ते २० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम बाळावर होत असल्याने महिलांनी काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला.   

गर्भवती मातेला पाचव्या किंवा सहाव्या महिन्यांत मधुमेह होण्याची भीती असते. याचा परिणाम गर्भातील बाळावर होतो. गर्भजलाचे प्रमाण कमी होऊन बाळाला आतडी, मेंदू, मणक्‍याचे आजार जडत आहेत. या काळात गर्भवती मातेची इन्सुलिनची गरज वाढते. प्रामुख्याने टाइप ‘टू’ होतो. गर्भावस्थेत मधुमेह औषधाने नियंत्रणात ठेवता येतो. प्रसूतीनंतर मधुमेह नॉर्मल होतो. परंतु गर्भावस्थेत मधुमेह झालेल्या महिलांना पुढील आयुष्यात पाच वर्षांनंतर मधुमेह होण्याची भीती असते. शिवाय नैसर्गिक प्रसूती होण्याची शक्‍यता कमी असते. यामुळे गर्भवतीला मधुमेह झाल्यास उपचार अत्यावश्‍यक आहेत.  

नोकरदार महिलांमध्ये जास्त प्रमाण 
कष्टकरी गर्भवती महिलांमध्ये गर्भावस्थेत मधुमेह होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, नोकरदार आणि एकाच ठिकाणी सातत्याने बैठे काम करणाऱ्या महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तासभर एका ठिकाणी बसून असल्यास किमान पाच मिनिटे उठून चालावे, असेही आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.  

अशी घ्या काळजी
स्थुलता, वाढते वय, रक्तदाब, चरबी प्रत्येक नागरिकांनी वेळोवेळी तपासून घ्यावी. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने नियमित रक्तशर्करा, रक्तदाब, चरबी, पेशीतील शुगर, किडनी, लिव्हर व आदींची नियमित तपासणी करून आहारात बदल करावा.  

ही आहेत लक्षणे
गर्भातील बाळाचे वजन वाढते
मातेचा रक्तदाब कमी वा जास्त होणे  
गर्भातील पाण्याचे प्रमाण वाढते किंवा कमी होते. 

Web Title: pregnant women diabetes