बाबो! बीडची महिला 21 व्या बाळाला देणार जन्म

पांडुरंग उगले
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एका पालावर राहत असलेली 21 व्या अपत्याला जन्म देणार आहे. याआधी 20 बाळंतपण घरीच झालेल्या या गरोदर महिलेची माहिती आरोग्य विभागाला मिळताच तिची जोखमीची माता म्हणून नोंद घेऊन रुग्णालयात हलविण्यात आले. सदरील महिलेला नऊ मुली व दोन मुले आहेत. यापूर्वी प्रसूतीनंतर तिची नऊ अपत्ये दगावली आहेत.

माजलगाव (जि. बीड) - माजलगाव शहराच्या कडेला पालावर राहणारी एक महिला 21 व्या बाळाला जन्म देणार असून, ती गरोदर असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर पथकाने रविवारी (ता. आठ) सकाळी पालावर जाऊन सदर महिलेला ग्रामीण रुग्णालयात आणून सर्व तपासण्या केल्या. जोखमीची माता असल्याने गरोदर महिलेस सोमवारी (ता. नऊ) बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. 

शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील केसापुरी वसाहत परिसरात मालोजी देविदास खरात हे पाल ठोकून राहतात. त्यांची पत्नी लंकाबाई या 21 व्या वेळी आठ महिन्यांच्या गरोदर आहेत. लंकाबाई यांना अगोदर नऊ मुली, दोन मुले अशी 11 अपत्ये आहेत. यापूर्वी नऊ अपत्ये बाळंतपण झाल्यानंतर दगावल्याचे त्यांनी सांगितले. यानंतरही त्या आता गरोदर असल्याची माहिती येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन रुद्रवार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियांका राजेभोसले, सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय पारगावकर, परिचारिका, आशा वर्कर आदी कर्मचाऱ्यांसह पथकाने पालावर जाऊन लंकाबाई यांची भेट घेतली.

त्यांची सर्व विचारपूस करून त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेभोसले यांनी त्यांच्या रक्ताच्या तपासण्या, सोनोग्राफी तपासणी केली असता सर्व रिपोर्ट सकारात्मक आले. मात्र, जोखमीची माता असल्याने त्यांना सोमवारी (ता. नऊ) जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

पहिल्यांदाच होणार रुग्णालयात प्रसूती 
लंकाबाई यांचे याअगोदर वीस बाळंतपण घरीच झाले आहेत; परंतु 21 वी प्रसूती पहिल्यांदाच रुग्णालयात प्रसूती होणार आहे. 

 

लंकाबाई या एकेविसाव्या वेळी गरोदर असल्याची माहिती मिळताच त्यांच्या सर्व तपासण्या करून पुढील उपचार, बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. 
-डॉ. अनिल परदेशी, 
तालुका आरोग्य अधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pregnant Womens story

टॅग्स