नियोजन करून संकटाकालीन पथके सज्ज ठेवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

परभणी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी घेतला प्रशिक्षण वर्ग

परभणी : कोरोनाचे संकट कधीही जिल्ह्यात येऊ शकते. त्यामुळे संकट आल्यास त्याविरोधात लढण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. त्यामुळे पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सोमवारी (ता. सहा) जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, अधिकारी यांचा प्रशिक्षण वर्ग जिल्हाधिकारी  दि. म. मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. सुदैवाने जिल्हयात आजपर्यंत एकही रुग्ण कोरोनाबाधित झालेला नाही. भविष्यात जिल्हयात कोरोनाबाधित रुग्ण होऊ नये या करिता आपलाल्या कठोर आणि कडक उपाय अंगिकारावे लागतील, असे श्री. मुगळीकर यांनी सांगितले.

हेही वाचा - संपर्कात आले असाल तर माहिती द्या अन्यथा दंडात्मक कार्यवाही

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, नोडल ऑफिसर जिल्हा रुग्णालय परभणी डॉ. किशोर सुरवसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश खंदारे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी आणि  डॉक्टर उपस्थित होते.

हेही वाचा - रक्त संकलनासाठी आमदाराचा पुढाकार

प्रतिसाद पथक तयार करावे
 पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची जागतिक, देशातील आणि राज्याची परिस्थिती पाहता कोणत्याही वेळी ही परिस्थिती कधीही तीव्र होईल. कधीही जिल्हात होऊ शकते, कधीही कोन्हीही पॉझिटिव्ह निघू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुढे काय ? आपला आपातकालीन नियोजन प्लॅन तयार असला पाहिजे. त्यासाठी तत्काळ प्रतिसाद पथक तयार करावे, दोन आशा सेविकांचे एक पथक तयार करून चार पथकांमागे एक वैद्यकीय अधिकारी आणि एक पर्यवेक्षक तयार करून एका पथकाने प्रतिदिन ५० घरांची पाहणी करून अहवाल सादर करावा. संशयित रुग्णांचे सर्वेक्षण नोडल ऑफिसर यांनी करावे. उचित कार्यवाही करावी, तसेच त्यांना सेल्फ क्वारंटाइनबाबत मार्गदर्शन करावे. हे काम करताना कोणीही चालढकल करू नये, असा इशारा शासकीय सेवेतील सर्वांना जिल्हाधिकारी यांनी दिला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prepare for emergency teams by planning,parbhani news