गणेश विसर्जनासाठी कायगावात जय्यत तयारी

जमील पठाण
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

गणेश भक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शांततेत आणि शिस्तीत करून निर्माल्य नदीत न टाकता स्वयंसेवकांना दान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी मंगळवारी (ता.10) केले.

कायगाव (जि.औरंगाबाद) : गणेश भक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शांततेत आणि शिस्तीत करून निर्माल्य नदीत न टाकता स्वयंसेवकांना दान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी मंगळवारी (ता.10) केले.

औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावरील जुने कायगाव (ता. गंगापूर) येथील गोदापात्रात गुरुवारी (ता.12) होणाऱ्या गणेश विसर्जन स्थळाला भेट देऊन पोलिस निरीक्षक सुरवसे यांनी पाहणी केली. पंचायत समिती सदस्य सुमित मुंदडा, सरपंच सुनीता गायकवाड, उपसरपंच निजाम शेख ,पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यांतून हजारो गणेशभक्त गणेशमूर्ती घेऊन मंगलमय वातावरणात आपल्या लाडक्‍या गणरायाला निरोप देण्यासाठी कायगाव टोका येथील गोदावरी व प्रवरा नदीच्या संगमात येतात. यावेळी पाच ते सहा हजारच्या वर गणेशमूर्तीचे विसर्जन होते. मध्यरात्रीपर्यंत विसर्जन चालते. यावेळी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नेवासा आणि गंगापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतो.
दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना अन्न, पाण्याची सोय आणि स्वयंसेवी जीवरक्षक दलाच्या युवकांना लाईफ जॅकेट, टी शर्ट मोफत देणार असल्याची माहिती सुमित मुंदडा यांनी दिली.

गणेश विसर्जनादरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी नदी पूल आणि श्री रामेश्वर मंदिर ठिकाणी 40 पोलिस कर्मचारी आणि चार पोलिस अधिकारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून कडक बंदोबस्त ठेवणार आहेत. तसेच स्थानिक 40 युवकांचे जीवरक्षक दल स्थापन केले आहे. यावेळी बोलताना श्री सुरवसे म्हणाले, की गणेश भक्तांनी तीन फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती गोदावरी नदीच्या पुलावर घेऊन जाव्यात, तर लहान मूर्ती रामेश्वर मंदिरालगतच्या घाटावरून विसर्जन करावे.

यावेळी रामेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील गायकवाड, कोषाध्यक्ष पोपटराव फाजगे, कायगाव बीट जमादार बाबासाहेब मिसाळ, गोपनीय शाखेचे पोलिस योगेश हारणे, रिझवान शेख, चंद्रभान गायकवाड, भीमराज निरपळ, पोलिस पाटील संजय चित्ते, सचिन तुपे, दशरथ बिरुटे, बाळू बिरुटे, बाळू चित्ते, दीपक फाजगे, नजीर शेख, अतिक शेख, रोहित बिरुटे, प्रशांत गवळी, विनोद बिरुटे, नितीन कान्हे, अजय जगधने, अविनाश जगधने, राजेंद्र फाजगे, अनिल फाजगे, अक्षय बिरुटे, अविनाश जगधने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparedness For Ganesh Idols Immerse