‘सकाळ’च्या वर्धापनदिनी विधायक कार्याचा गौरव

‘सकाळ’च्या वर्धापनदिनी विधायक कार्याचा गौरव

औरंगाबाद - आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्‍तींचा, त्यांच्या विधायक कार्याचा ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. एक जून) जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज सिडको नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात सायंकाळी साडेसात वाजता गौरव करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.

पर्यावरण संतुलनासाठी डॉ. हंसनाळे यांची धडपड
डॉ. श्रीनिवास शंकरराव हंसनाळे यांनी चाकूर (जि. लातूर) येथे चार वर्षांपूर्वी सावली फाउंडेशनची स्थापना करून वृक्षांची लागवड करण्यास सुरवात केली आहे. ‘एक पाऊल निसर्ग संवर्धनासाठी’ हे ब्रीद घेऊन दोनशे सदस्य वृक्षलागवड व संगोपनासाठी मेहनत घेत आहेत. शहरातील लातूर-नांदेड रस्त्याच्या दुतर्फा; तसेच शाळा, महाविद्यालय, तहसील, न्यायालय, ग्रीनबेल्ट आदी ठिकाणी जवळपास दहा हजार वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षांना लोकसहभागातून ट्री गार्ड बसविण्यात आले असल्यामुळे त्यांची जोमदार वाढ होत आहे. डॉ. हंसनाळे हे जांब (ता.मुखेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असून, त्याठिकाणीही त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड केलेली आहे.

आम आदमी का डॉक्‍टर डॉ. रामप्रसाद लखोटिया
डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या शासकीय वैद्यकीय सेवेचा प्रारंभ निलंगा तालुक्‍यातून झाला. सेवेच्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्यामुळे प्रत्येक माणूस त्यांच्याशी जोडला गेला. त्यानंतर त्यांनी उदगीर, देवर्जन, अतनूर या प्राथमिक आरोग्य केंद्रांतून सेवा दिली. कुष्ठरोग निवारण अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी कुष्ठरोग्याच्या पुनर्वसनाचा सर्वांत मोठे शिबिर उदगीरात भरवले. सर्पदंश आणि विषबाधा झालेल्या रुग्णांना जीवदान द्यावे तर डॉ. लखोटियांनीच, अशी त्यांची ओळख या परिसरात झाली आहे. शासकीय सेवेत काम करताना परिघाबाहेर जाऊन रुग्णांना मदत करणाऱ्या डॉ. लखोटियांची ओळख उदगीर परिसरात ‘आम आदमी का डॉक्‍टर’ अशी आहे.

एचआयव्हीग्रस्तांसाठी झटणारे संध्या आणि दत्ता बारगजे 
बीड तालुक्‍यातील पाली येथे या दांपत्याने एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी वर्ष २००६ मध्ये इन्फंट इंडिया संस्थेची स्थापना केली. सुरवातीला २७ बालकांचा या ठिकाणी सांभाळ केला. आता ६९ बालके या ठिकाणी असून, आठ एचआयव्हीग्रस्त महिलाही या ठिकाणी आहेत. एचआयव्हीग्रस्त मुलांच्या सांभाळासह त्यांना नियमित आणि कौशल्यविकास शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्यान, दत्ता बारगजे हे जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. वर्ष २०११ मध्ये त्यांची मुखेड (जि. नांदेड) येथे बदली झाली. त्यामुळे या बालकांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. पत्नी संध्या बारगजे यादेखील महाविद्यालयात तासिका तत्त्वावर कार्यरत होत्या.  

अनाथांचे आधार बनलेले मयूरी आणि सुरेश राजहंस 
या दांपत्याने ब्रह्मनाथ येळंब (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथे वर्ष २०११ पासून तमाशा कलावंत, अनाथ मुलांच्या संगोपनासाठी सेवाश्रम सुरू केला. सुरवातीला ११ मुलांचा सांभाळ केला जाई. आता या ठिकाणी १४ मुली आणि ३४ मुले, अशी ४८ चिमणीपाखरं आहेत. यामध्ये तमाशा कलावंत, अनाथ (भीक मागणारे), आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांचा समावेश आहे. मुलांना शिक्षणासह कौशल्य विकासाचे धडे देऊन आत्मनिर्भर करण्यासाठी हे दांपत्य प्रयत्नशील आहे. 

बेवारस मृतदेहांचे अंत्यविधी करणाऱ्या आशाबाई म्हस्के
औरंगाबाद शहरातील आशाबाई म्हस्के यांचे कर्तृत्व म्हणजे, स्त्री व पुरुषांच्या कामाची विभागणी केलेल्या समाजव्यवस्थेला दिलेले जबरदस्त उत्तर आहे. पुरुषही करणार नाहीत, असे काम आशाबाई म्हस्के यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या पंचशील महिला बचतगटाने केले आहे. मृत्यूनंतरही रक्ताच्या नातेवाइकांनी ज्यांची साथ सोडली, अशा सुमारे ३२०० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम एका तपापासून हा बचतगट करत आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी या संस्थेची निवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला व समाज, कुटुंबातील सदस्य काय म्हणतील याची पर्वा न करता, आशाबाई म्हस्के यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि हे काम अविरतपणे सुरू आहे. 

घाटी रुग्णालयातील केके ग्रुपचे अकिल अहेमद, किशोर वाघमारे
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरात १० ते १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या के. के. ग्रुपचा रुग्ण व नातेवाइकांच्या मदतीसाठी कायम पुढाकार असतो. रक्तदान शिबिरे, रात्री-अपरात्री रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना आर्थिक, वैद्यकीय मदत मिळून देण्यासाठी कट्ट्यावरचा टाईपास टाळून निःस्वार्थ भावनेने या ग्रुपचे सदस्य सेवा करतात. या ग्रुपचे तीनशेहून अधिक सदस्य आहेत. 

रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर 
औरंगाबाद शहरातून खेलो इंडिया या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जिम्नॅस्टिक खेळात सलग दोन वर्षे पदके जिंकण्याचा पराक्रम या भगिनींनी केला आहे. औरंगाबाद शहरातून ऑलिंपिकपूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी त्यांची यावर्षी (२०१९) निवड करण्यात आली आहे. कोलकाता, ऐजोल आणि पुण्यातील राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्रासाठी पदके जिंकून राज्याला सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. वरिष्ठ गटात खेळूनही कनिष्ठ गटातील या खेळाडूंनी मोठी कर्तबगारी गाजवली आहे. 

 एचआयव्हीग्रस्त मुलांचे बालगृह चालविणारे वाकुडे
नितीन वाकुडे हे बाबासाई संस्थेच्या मार्फत औरंगाबादच्या शिवशंकर कॉलनीत एचआयव्हीग्रस्त मुलांचे बालगृह चालवतात. सध्या ते ४४ एचआयव्हीग्रस्त मुला-मुलींचा सांभाळ करून, त्यांच्या राहण्या-जेवणाची व औषधोपचारांची काळजी घेतात. वाकुडे यांनी वसतिगृह उभारून या मुलांचा सांभाळ सुरू केला आहे. एचआयव्हीग्रस्त मुलांचा आधार म्हणून त्यांचे कार्य पुढे आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com