'त्‍या' मुख्याध्यापकासाठी खऱ्या अर्थाने शाळेचा पहिला दिवस

मंगेश शेवाळकर
सोमवार, 17 जून 2019

हिंगोली : किडनी प्रत्‍यारोपणानंतर ठणठणीत बरे होवून तब्‍बल सात महिन्यानंतर शाळा व विद्यार्थी पाहून सोमवारी (ता. 17) मुख्याध्यापक सुभाष बेंगाळ यांच्‍या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मोठ्या आजारातून बाहेर पडून शाळेत रुजू झाल्‍यानंतर खऱ्या अर्थाने वरुड गवळी (ता. हिंगोली) येथील मुख्याध्यापक बेंगाळ यांच्‍यासाठी शाळेचा पहिलाच दिवस ठरला.

हिंगोली : किडनी प्रत्‍यारोपणानंतर ठणठणीत बरे होवून तब्‍बल सात महिन्यानंतर शाळा व विद्यार्थी पाहून सोमवारी (ता. 17) मुख्याध्यापक सुभाष बेंगाळ यांच्‍या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मोठ्या आजारातून बाहेर पडून शाळेत रुजू झाल्‍यानंतर खऱ्या अर्थाने वरुड गवळी (ता. हिंगोली) येथील मुख्याध्यापक बेंगाळ यांच्‍यासाठी शाळेचा पहिलाच दिवस ठरला.

तालुक्‍यातील वरुड गवळी येथील शाळेतील मुख्याध्यापक सुभाष बेंगाळ यांना सन 2012 मध्ये किडणीचा आजार असल्‍याचे स्‍पष्ट झाले. मात्र या परिस्‍थितीत विद्यार्थ्यांसोबत खेळीमेळीच्‍या वातावरणात राहून ज्ञानार्जन करणाऱ्या श्री बेंगाळ यांना या आजाराने फारसा त्रास दिला नाही. मात्र सन 2018 मध्ये त्रास वाढल्‍यानंतर झालेल्‍या तपासणीमध्ये जन्‍मतः एक किडणी असल्‍याचे स्‍पष्ट झाल्‍यानंतर बेंगाळ कुटूंबियाना धक्‍का बसला. एकमेव असलेली किडणी निकामी होत असल्‍याने पुढे काय होणार हा प्रश्न बेंगाळ कुटूंबियांना भेडसावू लागला होता. किडणीदाता मिळणार का याचा शोध असताना त्‍यांची पत्‍नी सुरेखाताई यांनी किडणी देण्याचा निर्णय घेतला. त्‍यानुसार औरंगाबाद येथे किडणी प्रत्‍यारोपण करण्याचे ठरले. त्‍यासाठी डिसेंबर 2018 पासून बेंगाळ यांनी रजा घेतली. पुढे शाळेमध्ये येवू शकेल की नाही याची शाश्वती नसल्‍याने बेंगाळ यांनी सर्व विद्यार्थी, सहकारी शिक्षक व गावकऱ्यांशी चर्चा करून निरोप घेतला. विद्यार्थी व गावकऱ्यांच्‍या डोळ्यात आश्रू उभे राहिले होते.

मात्र औरंगाबाद येथे जानेवारी महिन्यात किडनी प्रत्‍यारोपण यशस्‍वी झाल्‍यानंतर त्‍यांना जून महिन्यापासून शाळेत रुजू होण्याची परवानगी देण्यात आली. त्‍यानुसार आज मुख्याध्यापक बेंगाळ शाळेमध्ये हजर झाले. धुळीमुळे त्रास होवू नये यासाठी तोंडाला मास्‍क लावून शाळेत आलेले बेंगाळ सुमारे अर्धातास शाळेची पाटी व विद्यार्थ्यांकडे पाहत राहिले. सात महिन्यानंतर शाळा व विद्यार्थी बघितल्‍यानंतर बेंगाळ सरांच्‍या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तर बेंगाळ सरांना पाहून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्‍त केला. शाळेचे वातावरण अगदीच भावून होवून गेले होते. त्‍यांचे सहकारी असलेल्‍या सुभाष जिरवणकर व इतर शिक्षकांनी त्‍यांचे पुष्पगुच्‍छ देवून स्‍वागत केले. विद्यार्थी व सहकारी शिक्षक व शाळेची इमारत पाहून बेंगाळ यांच्‍या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. किडणीच्‍या गंभीर आजारावर मात करून शाळेमध्ये रुजू होणाऱ्या बेंगाळ यांच्‍यासाठी खऱ्या अर्थाने शाळेचा पहिला दिवस ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: principal attends school after kidney transplantation